पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींना पत्र लिहित सिद्धूंचा मंत्रिपदाचा राजीनामा

नवज्योतसिंग सिद्धू

क्रिकेटपटू ते राजकीय नेता असा प्रवास केलेले नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सिद्धूंनी स्वतः टि्वट करत याची माहिती दिली. टि्वटरवर त्यांनी एक पत्र पोस्ट केले आहे. हे पत्र त्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना संबोधित करत राजीनामा दिला आहे. १० जूनलाच राजीनामा पाठवला होता असे सिद्धू यांनी म्हटले आहे.

आपण लवकरच आपला राजीनामा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याकडे पाठवणार असल्याचे सिद्धू यांनी रविवारी आणखी एका टि्वटमध्ये म्हटले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री कार्यालयाने सिद्धू यांचा राजीनामा मिळाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षांकडे राजीनामा पाठवल्याचे त्यात म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील मतभेद वाढले होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही दोघांमधील वाद शिगेला पोहोचला होता. अमरिंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या बैठकीला सिद्धू अनुपस्थितीत राहिले होते.

लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या खराब कामगिरीस आपल्याला जाणूनबुजून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप सिद्धूंनी केला होता. अमरिंदर सिंग यांनी सिद्धूंकडील काही खाती काढून घेतली होती. सिद्धूंकडे आधी स्थानिक प्रशासन आणि पर्यटन-सांस्कृतिक मंत्रालय होते. ही खाती काढून घेत त्यांना अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाचा पदभार देण्यात आला होता. खाती बदलल्यापासून सिद्धूंची नाराजी आणखी वाढली होती. 

पत्नी नवज्योत कौर यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्यामुळे सिद्धूंनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली होती. अमरिंदर सिंग यांनीही सिद्धू हे महत्वकांक्षी असून कदाचित त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल, असे म्हटले होते.