देशातील कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग मंदावला असल्याची माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी दिली. २१ मार्च रोजी कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा दुप्पटीने होणारा वेग हा तीन दिवसाने दुप्पट झाला. २४ एप्रिलला यात आणखी घट झाली असून कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दुप्पट होण्याचा दर आता दहा दिवसांच्या कालावधीपर्यंत आला आला आहे. चीनच्या वुहानमधून देशात शिरकाव केलेल्या जीवघेण्या विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. देशव्यापी लॉकडाउन, आंतरराष्ट्रीय विमानसेवेला स्थगिती, आणि कोरोना चाचणीशिवाय क्वॉरंटाइनचा निर्णय मत्वपूर्ण ठरला.
'देशातील ८० जिल्ह्यात १४ दिवसांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही'
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ११ विशेष समितीची स्थापना केली आहे. या समितीपैकी दोन पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य रणनिती आकारणे गरजेचे होते. केंद्र सरकारने घेतलेले निर्णय हे महत्त्वाचे ठरले असून कोरोना विरोधातील लढा जिंकण्याच्या सकारात्मक धोरणांसाठी या निर्णयाची अंमलबजावणी कायम ठेवावी लागेल. यातील एका समितीच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ३०० होता. हा आकडा दुप्पट होण्याचा दर हा ३ .२ आणि ३.३ इतका होता. त्यानंतर २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली. २३ मार्चला परिस्थितीमध्ये सुधारणा झाली. कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांचा आकडा हा पाच दिवसांनी दुप्पट झाला. ६ एप्रिलनंतर हा दर दहा दिवसांवर पोहचला. लॉकडाउनच्या निर्णयामुळे हे शक्य झाले. लॉकडाउनमुळे देशात अनेकांचा जीव वाचला, असेही समितीच्या अध्यक्षांनी सांगितले.
रमजानच्या नमाजसाठी घराबाहेर पडू नका, ओवेसींचे आवाहन
नीती आयोगाचे सदस्य असलेले डॉक्टर व्हीके पॉल म्हणाले की, लॉकडाउनच्या निर्णयामुळे कोरोना विषाणूचा दुप्पट होणारा दर कमी झाला. सध्याच्या घडीला देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा २३ हजार आहे. जर लॉकडाउन सारखा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला नसता तर आजच्या घडीला देशातील ७३ हजारहून अधिक लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याचे चित्र पाहायला मिळाले असते.