पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

६ जूनला मान्सूनचे आगमन, स्कायमेटनंतर हवामान विभागाचा अंदाज

मान्सून (संग्रहित छायाचित्र)

स्कायमेटनंतर आता भारतीय हवामान विभागानेही मान्सूनबाबत अंदाज व्यक्त केला आहे. यंदा मान्सून हा आपल्या आगमनाच्या सामान्य तारखेपेक्षा पाच दिवसांनंतर म्हणजे ६ जून रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. यापूर्वी स्कायमेटने मान्सून तीन दिवस उशिराने ४ जूनला केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता. सामान्यपणे केरळमध्ये १ जूनला मान्सून येत असतो. 

मान्सून ४ जूनला भारतात दाखल होणार

स्कायमेटचे मुख्य निर्देशक जतीन सिंह यांनी मंगळवारी म्हटले की, 'यावेळी मान्सून ४ जून रोजी केरळमध्ये दाखल होऊ शकतो. पण तरीही आम्ही यात २ दिवसांचे एरर मार्जिन ठेवले आहे. तसेच यावर्षी मान्सूनची स्थिती चांगली दिसत नाही.' 

नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी साधारणपणे १ जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर पुढच्या सहा ते आठ दिवसांमध्ये तो दक्षिण महाराष्ट्रात येऊन पोहोचतो. स्कायमेटने जारी केलेल्या अंदाजानुसार संपूर्ण जून महिना आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या इतर काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मराठवाड्यात सध्याही तीव्र दुष्काळ आहे. येत्या वर्षभरातही त्यामध्ये फारसा बदल होईल, असे वाटत नसल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असे वाटत नाही. काही ठिकाणी सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

मान्सून यंदा महाराष्ट्रावर नाराज राहण्याचा अंदाज

दरम्यान, स्कायमेट हवामान अभ्यास संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, एल निनोच्या प्रभावामुळे देशात सर्वसामान्य कमी पाऊस पडेल. यात पूर्व, ईशान्य आणि मध्य भारतासह उत्तर पश्चिम आणि दक्षिण भागात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाची दिर्घकालीन सरासरी ९३ टक्के इतकी असेल. ९० ते ९५ टक्के पाऊस हा सामान्यपेक्षा कमी श्रेणीत मोडतो. जर हा पूर्व अंदाज खरा ठरला तर सामान्यपेक्षा कमी मान्सूनचे हे सलग दुसरे वर्ष ठरेल.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:monsoon enter date in india after skymet weather department says monsoon will enter in kerala on 6th june