शांत आणि संयमीपणासाठी ओळखले जाणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रविवारी आपले मौन सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार भारतातील युवक, शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी सर्वांधिक वेदनादायी सरकार ठरल्याची टीका त्यांनी केली आहे. मोदी सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ सर्वांत दुखदः कहाणी ठरल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ते म्हणाले, मोदींनी देशातील जनतेला 'अच्छे दिन'चे वचन देऊन सत्ता मिळवली होती. त्यांच्या कार्यकाळात भारतातील युवक, शेतकरी, व्यापारी, व्यवसाय आणि लोकशाहीतील प्रत्येक संस्थेसाठी सर्वांत वेदनादायी आणि विनाशकारी सरकार राहिले आहे.
२०१४ पूर्वीही अनेक सर्जिकल स्ट्राईक, पण जाहिरात नाही केली - मनमोहन सिंग
'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, मोदींनी आमच्या सरकारला अपमानजनक आणि अस्वीकार्य मानले आहे. उलट यूपीए सरकार प्रत्येक चौकशीसाठी तयार होते. मी चौकशीचे स्वागत केले. तरीही मोदी हे भ्रष्टाचाराच्या आरोपावर आमच्या सरकारला अपमानजनक आणि अस्वीकार्य मानतात.
यावेळी कोणत्याही प्रकारची मोदी लाट नाही. देशातील लोक अशा सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी तयार आहेत, जे सर्वांगिण विकासावर विश्वास ठेवत नाहीत. फक्त राजकीय फायदा घेण्यासाठी मोदी सरकार सत्तेचा वापर करत आहे. मागील पाच वर्षांत भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढतच गेल्याचा दावा त्यांनी केला.
नोटाबंदी हा या सरकारचा सर्वांत मोठा घोटाळा होता. राष्ट्रीय सुरक्षेबाबतही मोदी सरकारची कामगिरी निराशजनक होती. या सरकारच्या काळात दहशतवादी घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचा आरोपही मनमोहन सिंग यांनी केला.
मोदी सरकारच्या काळात दहशतवादी हल्ल्याच्या घटनेत १७६ टक्क्यांची वाढ झाली असून मागील पाच वर्षांत शस्त्रसंधीचे प्रमाण हे १००० टक्क्यांनी वाढल्याचेही त्यांनी म्हटले.