या पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचे बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी सोमवारी जाहीर केले. त्यांच्या या घोषणेमुळे उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाशी त्यांनी कायमस्वरुपी ब्रेकअप घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी आघाडीकरून निवडणूक लढविली होती. पण त्याचा फायदा झाला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर मायावती यांनी हा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला रोखण्यासाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेकांना धक्का बसला होता. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसेल, असे राजकीय वर्तुळात बोलले गेले होते. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. महाआघाडीला उत्तर प्रदेशात चमकदार कामगिरी करता आली नाही.
परन्तु लोकसभा आमचुनाव के बाद सपा का व्यवहार बीएसपी को यह सोचने पर मजबूर करता है कि क्या ऐसा करके बीजेपी को आगे हरा पाना संभव होगा? जो संभव नहीं है। अतः पार्टी व मूवमेन्ट के हित में अब बीएसपी आगे होने वाले सभी छोटे-बड़े चुनाव अकेले अपने बूते पर ही लड़ेगी।
— Mayawati (@Mayawati) June 24, 2019
उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी ६४ जागांवर भाजपला यश मिळाले. तर महाआघाडीला केवळ १५ जागांवर यश मिळवता आले. बसपाला १० तर समाजवादी पक्षाला ५ जागांवर यश मिळाले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच या दोन्ही पक्षांमधील दुरावा वाढला होता. आता हा दुरावा पुन्हा एकदा कायमचाच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बहुजन समाज पक्ष यापुढी सर्व लहान, मोठ्या निवडणुका स्वबळावरच लढण्याचे मायावती यांनी सोमवारी जाहीर केले.