पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मी दुबळी नाही, आझम खान यांना पराभूत करणारच'

जयाप्रदा

जयाप्रदा दुबळी नाही. मी कुठेही निघून जाणार नाही. इथेच राहून आझम खान यांचा निवडणुकीत पराभव करून दाखवणार. मला स्वतःला याबद्दल पूर्ण खात्री आहे, असे अभिनेत्री जयाप्रदा यांनी म्हटले आहे. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी जयाप्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच 'हिंदूस्थान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत घडल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. 

आझम खान यांच्या वक्तव्यामुळे मला धक्काच बसला होता. त्यांनी मला आणि अमर सिंह यांना पक्षातून काढून टाकल्यानंतरही मी त्यांना भाऊच मानत होते. पण त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. शेलक्या शब्दांत समोरच्यावर टीका करणे ही त्यांची परंपराच आहे. पण दरवेळी ते आणखी खालच्या पातळीवर घसरत चालले आहेत, हेच यातून दिसून येते, असे जयाप्रदा यांनी म्हटले आहे. असा माणूस उद्या निवडून आला तर काय होईल, या विचारानेही मला अस्वस्थ होते. एक गोष्टीचा आनंद आहे की त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आता कायदा त्यांना नक्कीच धडा शिकवेल, असेही त्या म्हणाल्या.

प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. असे पुरुष जर अवतीभोवती असतील, तर महिलांची परिस्थिती काय असेल. या लोकांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. मी कुठेही जाणार नाही. मी दुबळी नक्कीच नाही. त्यामुळे मी त्यांना निवडणुकीत हरवून दाखवणारच, असे जयाप्रदा यांनी स्पष्ट केले.

आझम खान जयाप्रदा यांच्याविरोधात लोकसभेला निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जयाप्रदा या भाजपकडून तर आझम खान समाजवादी पक्षाकडून रामपूरमधून निवडणूक लढवित आहेत. आझम खान यांनी २००४ मध्ये जयाप्रदा यांना रामपूर मतदार संघातील निवडणुकीत यश मिळवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण नंतर या दोघांमध्ये दूरावा निर्माण झाला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:LokSabha Elections 2019 What would happen if such a man gets elected Jaya Prada on Azam Khan