पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मला शिव्या देण्याची स्पर्धा सुरुः नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

बिहारमधील बक्सर येथील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. देशात सध्या मोदीला शिव्या देण्याची स्पर्धा सुरु असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. विरोधक जिंकू शकत नसल्याने ते प्रचंड संतापले असून मोदींना शिव्या देऊन ते आपले नैराश्य बाहेर काढत आहेत, अशी टीका त्यांनी केली. 

तुमचा उत्साह आणि पाठिंब्यामुळे निवडणुकीच्या सहा टप्प्यानंतर विरोधकांची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे मोदीला शिव्या देण्याच्या स्पर्धेला वेग आला आहे. ते जिंकू शकत नाहीत. शिव्या देऊन आपले नैराश्य बाहेर काढत आहेत, असे ते म्हणाले. 

विरोधक केंद्रात दुबळे आणि कमकुवत खिचडी सरकार आणण्याच्या प्रयत्नात होते. दुबळे सरकार आले तर सरकारला ब्लॅकमेल करुन जनतेला लुटण्याचा परवाना मिळेल असा त्यांनी विचार केला होता. पण चौकीदाराने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मंगळवारी त्यांनी पुन्हा एकदा मोदींवर टीका करताना आता तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मोदींना मदत करणे बंद केले असल्याचा आरोप केला. मोदींची नाव आता बुडायला लागली असल्याचे त्यांनी म्हटले.