युपीए सरकार सत्तेत असताना एकापेक्षा जास्त वेळा भारताकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. पण तेव्हाच्या सरकारने त्याचा राजकीय फायदा कधीच घेतला नाही. मते मिळवण्यासाठी हा मुद्दा आम्ही कधीच उपस्थित केला नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार आर्थिक आघाडीवर सपशेल अपयशी ठरल्यामुळे त्यांच्याकडून सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय वापर केला जातो आहे. ही अत्यंत निंदनीय स्थिती असल्याचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.
'हिंदूस्थान टाइम्स'च्या प्रतिनिधी सुनेत्रा चौधरी यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करीत टीका केली. ते म्हणाले, २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आमच्या सरकारनेही लष्कराच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यावर विचार केला होता. पण त्यापेक्षा आम्ही पाकिस्तानला राजनैतिक पातळीवर उघडे पाडण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे तळ आहेत, हे जगापुढे आणून त्यांना एकटे पाडण्यावर आम्ही भर दिला. मुंबई हल्ल्यानंतर १४ दिवसांच्या आत चीनने लष्करे तैय्यबाचा म्होरक्या हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास होकार दिला होता. हाफिज सईदवर आम्ही १ कोटी डॉलरचे बक्षिसही त्यावेळी जाहीर केले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसवाले मला मारण्याची स्वप्ने बघत आहेत: नरेंद्र मोदी
२०१४ पूर्वीही सीमारेषेपलीकडे अनेक लष्करी कारवाया करण्यात आल्या होत्या, असे विविध आजी आणि माजी लष्करी अधिकाऱ्यांनी 'हिंदूस्थान टाइम्स'च्या प्रतिनिधींना सांगितले आहे. फक्त त्यामध्ये फरक एवढाच होता की, त्यावेळचे सरकार अशा स्वरुपाच्या कारवाया सार्वजनिक करीत नव्हते. आताचे सरकार अशा स्वरुपाच्या कारवायांची जबाबदारी उघडपणे स्वीकारत आहे. त्याचबरोबर आम्ही दहशतवाद्यांना मारण्यासाठी सीमेपलीकडेही जाऊ शकतो. हे जगाला सांगण्यावर या सरकारचा भर आहे, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्जिकल स्ट्राईक साड्यांना मोठा प्रतिसाद, मोदींच्या प्रतिमेचा वापर
लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा बनवला आहे. मोदी सरकारने २९ सप्टेंबर २०१६ रोजी सर्जिकल स्ट्राईक केला होता. उरी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हा स्ट्राईक करण्यात आला होता. यानंतर पुलवामा हल्ल्याला उत्तर देण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी सरकारने एअर स्ट्राईकही केला. या दोन्हींची माहिती लष्कराकडून माध्यमांना देण्यात आली होती.