भाजपने आम आदमी पक्षाचे सात आमदार विकत घेण्यासाठी १० कोटींची ऑफर दिल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर केजरीवाल यांनी हे आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मागील तीन दिवसात आमच्या सात आमदारांना भाजपकडून संपर्क साधून प्रत्येकाला १० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. भाजपचे लोक आमच्या आमदारांना विकत घेऊ इच्छितात आणि हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही, अशी टीका केजरीवाल यांनी केली.
मोदी परत निवडून आले तर राहुल गांधी जबाबदार - केजरीवाल
या निवडणुकीत मतदार चांगल्या कामांना महत्व देत आहेत आणि आम आदमी पार्टी लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. दिल्लीत आपने शिक्षण, आरोग्यासारख्या मुलभूत मुद्द्यांवर चांगले काम केले असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
मोदीजी फक्त आपल्या नावावर मते मागत आहेत. आम्ही मात्र कामाच्या आधारावर लोकांमध्ये जाऊन मत देण्याचे आवाहन करत आहोत. जर दिल्लीतून सातही खासदार संसदेत गेले तर केंद्रात केवळ पक्षाची बाजूच ऐकली जाईल असे नव्हे तर दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळण्यास मदत मिळेल, असेही ते म्हणाले.