पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवडणूक तर झाली... पण आता राहुल आणि प्रियांका गांधींपुढे आव्हाने काय?

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा

लोकसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर विश्वास दाखवला असून, त्यांना बहुमताने निवडून दिले आहे. लोकसभेमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपच्या जागा वाढल्या आहेत. त्यांनी ३०० जागांचा आकडा पार केला आहे. त्याचवेळी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला यंदाही विरोधी पक्षनेतेपद मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. या सर्वामध्ये काँग्रेस पक्षातील दोन प्रमुख नेते अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांची बहिण प्रियांका गांधी यांच्यापुढे काय आव्हाने असू शकतील, याचा घेतलेला आढावा....

राहुल गांधी
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन राज्यांत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आत्मविश्वास वाढला होता. त्याचबरोबर देशातील शेतकऱ्यांचा सरकारवर असलेला रोष, बेरोजगारी हे मुद्दे लोकसभा निवडणुकीत प्रभावी ठऱतील आणि त्यामुळे भाजप सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, असे त्यांना वाटले होते. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीमधून पराभव पत्करावा लागला. तर काँग्रेसलाही निवडणुकीत अपयश आले. या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांना पुढील रणनिती आखताना फार विचार करावा लागणार आहे.

अमेठीत राहुल गांधी पराभूत, स्मृती इराणींनी असे मिळवले यश...

काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाला तूर्त कोणी आव्हान देईल, असे दिसत नाही. पण पुढील काळात कार्यकर्त्यांना कार्यक्रम द्यावा लागेल. विविध राज्यांमध्ये काँग्रेसचा जनाधार वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्याचबरोबर लोकसभेत देशातील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करून त्यांना मोदी सरकार कुठे कमी पडते आहे, हे सातत्याने लोकांसमोर आणावे लागेल. 

केंद्रात मोदी सरकारच्या कामावर लक्ष ठेवतानाच आपला पक्ष वेगवेगळ्या राज्यांमध्ये कामगिरी कशा प्रकारे सुधारेल, याकडेही त्यांना लक्ष द्यावे लागेल. पुढील लोकसभेची निवडणूक २०२४ मध्येच होईल. त्यावेळी काँग्रेस साधारणपणे दोन दशके सत्तेतून बाहेर असेल. त्यामुळे नवी आव्हाने निर्माण झालेली असतील. त्यावरही राहुल गांधी यांना मार्ग काढावा लागेल. पुढील काळात पुन्हा आघाडीच्या माध्यमातून भाजपला टक्कर द्यायची की स्वतंत्रपणे काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवायची हे सुद्धा राहुल गांधी यांना ठरवावे लागणार आहे.

प्रियांका गांधी
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणले. पक्षाने त्यांना राष्ट्रीय सरचिटणीसपद देऊन त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविली. निवडणुकीच्या प्रचारावेळी प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमध्येच ठाण मांडून होत्या. पण निकाल बघितल्यावर त्याचा काँग्रेसला काहीही फायदा झाल्याचे दिसत नाही. प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात येण्यामुळे काँग्रेसला देशातही यश मिळवता आलेले नाही. 

उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे लक्ष ठेवून प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात आल्याचे सांगितले जात असले, तरी त्यांचा सक्रिय राजकारणातील प्रवेश चुकलाच म्हणावा लागेल. काँग्रेस पक्षाची उत्तर प्रदेशमधील पक्ष संघटना कमकुवत आहे. पक्षाचा जनाधार उरलेला नाही. प्रादेशिक आणि स्थानिक नेतृत्त्व अत्यंत कमकुवत आहे. अशा वेळी प्रियांका गांधी चार महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशात फार वेगळी कामगिरी करतील, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचेच होते. त्यातच आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसल्यामुळे त्याचा परिणाम पुढील विधानसभा निवडणुकीवर होईलच. त्यावेळी मतदार प्रियांका गांधी यांना कितपत गांभीर्याने घेतील, याबद्दल शंकाच आहे.

... आणि लोकसभा निवडणुकीत युतीच्या यशाचे शिलेदार ठरले देवेंद्र फडणवीस

प्रियांका गांधी यांचे वक्तृत्त्व राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त प्रभावी आहे. गांधी कुटुंबातील व्यक्ती आणि माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची छबी यामुळे काही लोकांना त्यांच्याबद्दल ममत्व आहे. या जीवावर काँग्रेस पुढील विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधींचा उत्तर प्रदेशमध्ये उपयोग करून घेऊ शकतो. 

भारतातील मतदार बदलला आहे. तुम्ही कुठल्या कुटुंबातील आहात, याबद्दल फारकाही देणेघेणे नाही. त्यामुळे या बदललेल्या मानसिकतेमध्ये स्वतःचे नेतृत्त्व पुढे नेणे आणि पक्षाला यश मिळवून देणे हे राहुल आणि प्रियांका या दोघांसाठी आव्हान असेल.