पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक्झिट पोल जाहीर होत असताना शरद पवार यांची 'फोन पे चर्चा'

शरद पवार

एकीकडे गेल्या रविवारी संध्याकाळी वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोलचे आकडे जाहीर होत होते. त्याचवेळी महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपच्या गोटात नसलेल्या आणि विरोधकांच्या आघाडीपासूनही चारहात लांब राहलेल्या तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी फोनवर बोलण्यात व्यग्र होते.
'हिंदूस्थान टाइम्स'ला मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी त्या दिवशी बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती आणि वायएसआर काँग्रेस याच्या नेत्यांशी संपर्क साधला. यापैकी वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी हे त्या दिवशी परदेशात असल्यामुळे त्यांचे आणि शरद पवार यांचे बोलणे होऊ शकले नाही. पण शरद पवार यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनाईक यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्याचबरोबर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशीही त्यांनी संवाद साधला.

त्रिशंकू लोकसभा अस्तित्त्वात आल्यास पुढील हालचालींसाठी UPA सज्ज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादजवळ असलेल्या के. चंद्रशेखर राव यांच्या फार्महाऊसवर या दोन्ही नेत्यांची भेटही झालेली आहे. जर त्रिशंकू लोकसभा असित्त्वात आली, तर आपला पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडीला UPA पाठिंबा देईल, असे आश्वासन के. चंद्रशेखऱ राव यांनी शरद पवारांना दिलेले असल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, तेलंगणा राष्ट्र समितीचे राज्यसभेतील खासदार जे. संतोष कुमार यांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे म्हटले आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये राज्यसभेतील उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीपासूनच शरद पवार आणि नवीन पटनाईक हे दोघे एकमेकांच्या संपर्कात आहेत. जर गरज पडली तर बिजू जनता दल युपीएला मदत करेल, असेही आश्वासन त्यांच्याकडून मिळाले असल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले. पटनाईक यांच्या कार्यालयाने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

एक्झिट पोलच्या नौटंकीला गांभीर्याने घेण्याची गरज नाही : शरद पवार

राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएव्यतिरिक्त इतर सर्वच पक्षांच्या नेत्यांशी शरद पवार संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासून ते वेगवेगळ्या नेत्यांशी बोलत आहेत. आता आम्ही सगळेजण निकालांची उत्सुकतेने वाट पाहात आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार माजीद मेमन यांनी सांगितले.

या घटनाक्रमाबद्दल काँग्रेसच्या एका नेत्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, युपीएला पाठिंबा देण्यासाठी सकारात्मक असलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांशी बोलण्याचे काम शरद पवार करीत आहेत. ते सर्वांशी संवाद साधत आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha elections 2019 To bolster support for anti BJP bloc Sharad Pawar works the phone lines