लोकसभा निवडणुकीचे पहिले चार टप्पे पार पडले आहेत. पाचव्या टप्प्यामध्ये सोमवारी मतदान होणार आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानाचा अंदाज घेतल्यावर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवत आहेत. त्यापैकी एक म्हणजे कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने लोकामध्ये लाट नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत लोकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने लाट होती. ती जाणवतही होती. पण आता तशी स्थिती नाही. त्यामुळे या निवडणुकीचे निकाल काय येणार, हा विषय उत्सुकतेचा झाला आहे. राजकीय विश्लेषकांनुसार, या निवडणुकीत दोन प्रमुख आघाड्यांमध्ये मुख्य लढत आहे. त्यापैकी एक म्हणजे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA तर दुसरी आघाडी म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी UPA. या पैकी कोणत्याही एका आघाडीला जर देशात बहुमत मिळाले नाही. तर परिस्थिती काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. या स्थितीत काही राजकीय पक्षांना महत्त्व प्राप्त होईल.
समाजवादी पक्षाकडून मायावतींची फसवणूक, मोदींचा आरोप
एकूण पाच राजकीय पक्ष या स्थितीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी, तेलंगणातील तेलंगणा राष्ट्र समिती, ओडिशातील बिजू जनता दल, आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँग्रेस यांचा समावेश आहे. हे पाचही पक्ष सध्या एनडीए किंवा युपीएमध्ये सहभागी नाहीत. ते स्वतंत्रपणे आपली निवडणूक लढवित आहेत. निवडणुकीचा निकाल आल्यावर हे कोणत्या दिशेला जातील, हे सुद्धा स्पष्ट नाही. पण राजकीय विश्लेषकांनुसार, हे पाच राजकीय पक्ष निकाल जाहीर झाल्यावर त्यावेळच्या स्थितीनुसार कोणत्याही आघाडीकडे जाऊ शकतात. हे राजकीय पक्ष एनडीए किंवा युपीए यापैकी कोणत्याही राजकीय पक्षाचा हिस्सा होऊ शकतात. त्यामुळे या पाचही राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत या पाचही राजकीय पक्षांची कामगिरी फारशी चमकदार राहिली नव्हती. पण या निवडणुकीत या राजकीय पक्षांना मिळून ८० ते ९० जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी केल्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जागा नक्कीच वाढणार आहेत. तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती, ओडिशामध्ये बिजू जनता दल त्याचबरोबर आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेस यांचीही कामगिरी सुधारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जर या पाच राजकीय पक्षांकडे ८० ते ९० जागा आल्या, तर हे राजकीय पक्ष सत्तेच्या वाटाघाटीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
राहुल गांधींना पंतप्रधान झालेलं पाहायचं आहे- सॅम पित्रोदा
ज्या चार राज्यांमध्ये हे राजकीय पक्ष आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशामध्ये मिळून लोकसभेच्या एकूण १४३ जागा आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत या पाचही राजकीय पक्षांना मिळून केवळ ४४ जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये बिजू जनता दलाच्या २० जागा, तेलंगणा राष्ट्र समितीच्या ११ जागा, वायएसआर काँग्रेसच्या ९ जागा आणि समाजवादी पक्षाच्या ४ जागांचा समावेश आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव हे भाजप आणि काँग्रेस यांच्या नेतृत्त्वाखालील आघाडीपेक्षा वेगळ्या पर्यायावर भर देत असले, तरी लोकसभा निवडणुकीनंतर ते एनडीए किंवा युपीए यापैकी एका आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता जास्त असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. त्याचे प्रमुख विरोधक आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यावेळी युपीएसोबत असल्यामुळे चंद्रशेखर राव एनडीएसोबत जाण्याची शक्यता जास्त आहे.