लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळात आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देशभरात चर्चेत आलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आता २१ प्रहर (साधारण तीन दिवस) मौनव्रत धारण करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी हा निर्णय जाहीर केला. लोकसभा निवडणूक आता संपली आहे. त्यामुळे आता चिंतन करण्याची वेळ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
जिथे हिंसाचार झाला तिथे पुन्हा मतदान घ्या, भाजपची मागणी
आपल्या ट्विटमध्ये प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी माझ्या शब्दांमुळे कोणाला दुःख झाले असेल, तर मी त्यांची क्षमा मागते. सार्वजनिक जीवनात ज्या मर्यादा पाळायला हव्यात त्या न पाळल्यामुळे प्रायश्चित घेण्यासाठी मी २१ प्रहरांसाठी मौनव्रत धारण करीत आहे.
'२०१४ मध्ये उत्तर प्रदेशात जे झाले ते आता बंगालमध्ये होईल'
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहणार असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून काही दिवसांपूर्वीच राजकीय वर्तुळात त्यांच्यावर मोठी टीका करण्यात आली होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना आपण कधीच माफ करू शकणार नाही, असे म्हटले होते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांच्याबद्दलही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या दोन्ही वक्तव्यांनंतर त्यांनी माफीही मागितली होती. भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह रिंगणात आहेत.