पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपची भोपाळमधून उमेदवारी

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

मालेगाव स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच पक्षाने त्यांना भोपाळमधून उमेदवारी जाहीर केली. भोपाळमध्ये त्यांचा मुकाबला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याशी होणार आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीमुळे भोपाळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूकही रंगतदार होणार आहे.

मी औपचारिकपणे आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याचेही निश्चित केले असून, त्यात मला नक्कीच विजय मिळेल, असे साध्वी प्रज्ञासिंह यांनी सांगितल्याचे एएनआयने म्हटले आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांना चार भावंडे असून, ९० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकीय कामाला सुरुवात केली होती.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे कुटूंब वडिलांची बदली झाल्यामुळे ७० च्या दशकात उत्तर प्रदेशातून मध्य प्रदेशात आले होते. २००० मध्ये हे कुटूंब पुन्हा गुजरातमध्ये सुरत येथे स्थलांतरित झाले होते. त्यावेळी साध्वी प्रज्ञासिंह या इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेत होत्या.

२००७ मध्ये अलाहाबाद येथील कुंभमेळ्यात प्रज्ञासिंह यांनी साध्वी होण्याचा निर्णय घेतला होता. मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या आरोपावरून त्यांना २००८ मध्ये अटक करण्यात आली होती. या स्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता तर १०१ लोक जखमी झाले होते.