काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एक्झिट पोलनी वर्तविलेले लोकसभा निवडणुकीचे अंदाज फेटाळले आहेत. आपण २३ मे रोजी प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत थांबले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. विविध एक्झिट पोलनी रविवारी देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला NDA लोकसभेत बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे.
थरूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, सर्व एक्झिट पोल खोटे ठरतील, याचा मला विश्वास आहे. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या आठवड्यात ५६ वेगवेगळे एक्झिट पोल चुकीचे ठरले होते. भारतात अनेक मतदार आपण कोणाला मत दिले हे खरेपणाने सांगत नाहीत. समोरची व्यक्ती सरकारमधील असेल, असे वाटत असल्याने ते तसे करत नाहीत.
एक्झिट पोलचे अंदाज चुकीचेही ठरलेत, पाहा भूतकाळात काय घडलं
दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी कल्पनेवर आधारित पक्षीय बलावर विश्वास ठेवून बाष्कळ चर्चा करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी २३ मे पर्यंत वाट पाहिली पाहिजे, असे म्हटले आहे.
शशी थरूर यांच्या प्रमाणेच अन्य विरोधी नेत्यांनीही एक्झिट पोलमधील आकड्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक एक्झिट पोल चुकीचा ठरू शकत नाही. आता टीव्ही बंद करून सोशल मीडियातून लॉग आऊट होण्याची वेळ आली आहे, असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही रविवारी एक्झिट पोलवर टीका केली होती. लोकांच्या मनात नक्की काय आहे, हे समजून घेण्यात एक्झिट पोल अपयशी ठरले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.