पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आयईडीपेक्षा व्होटर आयडीमध्ये जास्त ताकद - नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

देशातील मतदार अत्यंत चाणाक्ष आहेत आणि त्यांच्या मतांची (व्होटर आयडी) ताकद ही दहशतवाद्यांच्या आयईडीपेक्षा जास्त आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी मंगळवारी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राबाहेर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना मोदी यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

अहमदाबाद पूर्वमधील भाजपचे उमेदवार हसमुखभाई पटेल यांच्यासोबत खुल्या जीपमधूनच मोदी यांचे मतदान केंद्रावर आगमन झाले. अहमदाबादमधील राणीप भागामध्ये निशान प्रशालेमध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

ते म्हणाले, तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होते आहे. माझे गृह राज्य गुजरातमध्ये मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मला मिळते आहे, हे माझे भाग्यच आहे. कुंभमेळ्यामध्ये गंगा नदीत डुबकी मारल्यावर एखाद्या भाविकाच्या मनात जे भाव असतात. तेच आज माझ्या मनात आहेत. लोकशाहीच्या महाउत्सवामध्ये सहभागी होऊन मत दिल्यानंतर तेच भाव माझ्या मनात उमटत आहेत.

दहशतवाद्यांचे हत्यार आयईडी (विस्फोटक) आहे. पण लोकशाहीची ताकद म्हणजे मतदाराचे आयडी असते. मी हे अगदी ठाम विश्वासाने सांगू शकतो की आयईडीपेक्षा जास्त ताकद मतदारांच्या आयडीमध्ये असते. त्यामुळेच आपण मतदारांचा आयडीची ताकद ओळखली पाहिजे.

मोदी मत देऊन बाहेर येत असताना तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी मोदी... मोदी... असा गजर सुरू केला. त्यानंतर मोदींनीही मतदान केल्याची खूण असलेले शाई लावलेले बोट उंचावून लोकांना अभिवादन केले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सुद्धा तिथे उपस्थित होते.