काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये गुरुवारी भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला. तो ही तब्बल ४९१०३ मतांनी.
गेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा स्मृती इराणी यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. पण त्यावेळी मोदी लाट असतानाही त्यांना या मतदारसंघात विजय मिळवता आला नव्हता. एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये त्यावेळी भाजपने मोठे यश मिळवित ७१ जागा आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. पण अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात भाजपला विजय मिळवता आला नव्हता. अखेर त्यातील एक कसर या निवडणुकीत भाजपने भरून काढली.
मतविभागणीचा शिंदेंना फटका, सलग दुसऱ्यांदा पराभव
विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी केली होती. त्यांनी अमेठी आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी आपले उमेदवार उभे केले नव्हते. या दोन्ही जागा त्यांनी काँग्रेससाठी सोडून दिल्या होत्या. त्यामुळे राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात सरळ सामना झाला. तरीही राहुल गांधी यांना स्मृती इराणी यांना पराभूत करता आले नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर स्मृती इराणी यांनी या मतदारसंघाकडे आपले लक्ष वळवले होते. त्या सातत्याने या मतदारसंघात दौरे करीत होत्या. त्याचबरोबर तेथील प्रश्नही मांडत होत्या. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाल्याचे दिसते. २०१७ मधील उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले होते. त्यानंतर स्मृती इराणी यांचा आत्मविश्वासही वाढला. त्यांनी या मतदारसंघावर आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले.
घाबरु नका, आत्मविश्वास ठेवा, राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना सल्ला
अमेठी हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. त्यामुळे तेथे गांधी घराण्यातील नेते कायमच मोठ्या मताधिक्याने विजयी होतात. २००९ मधील निवडणुकीत राहुल गांधी या मतदारसंघातून ३७०००० मताधिक्याने विजयी झाले होते. पण २०१४ मध्ये त्यांना स्मृती इराणींकडून जोरदार टक्कर मिळाल्यामुळे त्यांचे मताधिक्य १०८००० पर्यंत खाली आले आणि आता या निवडणुकीत पराभव सहन करावा लागला.
लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधी यांनी अमेठीसोबत केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढविण्याचे ठरविले. त्यावेळीच परिस्थिती काँग्रेसला फारशी अनुकूल नसल्याचे स्पष्ट झाले होते. अमेठीत पराभव होईल, या भीतीनेच राहुल गांधी यांनी वायनाडमधूनही निवडणूक लढविली होती, असे राजकीय अभ्यासक म्हणतात. दरम्यान, वायनाडमधून राहुल गांधी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.