पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Lok Sabha election 2019 : एक्झिट पोलचे अंदाज चुकीचेही ठरलेत, पाहा भूतकाळात काय घडलं

एक्झिट पोलनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए सत्तेत येईल, असा अंदाज वर्तविला.

देशात सध्या सगळीकडे केवळ एकच चर्चा आहे. येत्या गुरुवारी काय होणार? सगळ्यांचे लक्ष त्या दिवशी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे लागले आहे. तत्पूर्वी, वेगवेगळ्या एक्झिट पोलनी दिलेल्या अंदाजांनुसार, केंद्रात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे NDA सरकार सत्तेत येईल, अशी शक्यता आहे. 

गेले अडीच महिने सुरू असलेली सात टप्प्यांतील लोकसभा निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया रविवारी संपली. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात लोकसभेच्या ५९ जागांसाठी मतदान झाले. त्यानंतर लगेचच रविवारी संध्याकाळी वेगवेगळे एक्झिट पोलचे आकडे जाहीर होण्यास सुरुवात झाली.

बहुतांश एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा 'नमो-नमो'

जवळपास सर्वच एक्झिट पोलनी व्यक्त केलेल्या अंदाजांवरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला NDA २८५ ते ३३० या दरम्यान जागा मिळतील, असे दिसते. त्याचवेळी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीला UPA ८० ते १३० जागा मिळतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. अर्थात हे एक्झिट पोलचे अंदाज आहेत. याप्रमाणेच गुरुवारी निकाल येतील, असे म्हणता येणार नाही. कारण भूतकाळात डोकावून पाहिल्यास एक्झिट पोलचे आकडे आणि प्रत्यक्ष मतमोजणीनंतर पुढे आलेले आकडे यात अनेकवेळा मोठी तफावत आढळून आली आहे.

उदाहरण एक - १९९९
१९९९ मधील लोकसभा निवडणुकीत त्यावेळी एक्झिट पोल केलेल्या जवळपास सगळ्या संस्थांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३०० हून अधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. इंडिया टुडे-इनसाईटने ३३६ जागा, आऊटलूक-सीएमएसने ३२९ जागा, टाइम्सपोल-डीआरएसने ३३२ जागा एनडीएला मिळतील, असे म्हटले होते. पण प्रत्यक्षात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २९६ जागा मिळाल्या होत्या. 

राज्यात पुन्हा एकदा युतीच वरचढ ठरण्याचा अंदाज

उदाहरण दोन - २००४
२००४ मधील निवडणूक ही त्यावेळी 'इंडिया शायनिंग'मुळे गाजली होती. भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी त्यावेळी पंतप्रधान होते. देशात पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार येईल, अशी चर्चा होती. एक्झिट पोलनेही तसेच अंदाज वर्तविले होते. आऊटलूक-एमडीआरएने त्यावेळी एनडीएला २९० जागा, आजतक-ओआरजी मार्गने २४८ जागा, एनडीटीव्ही-इंडियन एक्स्प्रेसने २५० जागा, स्टार-सी व्होटरने २७५ जागा दाखवल्या होत्या. पण प्रत्यक्षात एनडीएला केवळ १८९ जागा मिळाल्या. त्याचवेळी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीला २२२ जागा मिळाल्या. त्यावेळी डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाले होते. या निवडणुकीत एक्झिट पोलचे अंदाज चुकले होते.

उदाहरण तीन - २००९
२००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर होते. त्यावेळी अमेरिकेसोबतच्या अणूकरारवरून डाव्यांनी डॉ. मनमोहन सिंग सरकराचा पाठिंबा काढून घेतला होता. दुसरीकडे भाजपमध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढविली जात होती. यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर बहुतांश एक्झिट पोलनी संयुक्त पुरोगामी आघाडीला २०० पेक्षा कमी जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. स्टार न्यूज-एसी नेल्सनने युपीएला १९९ जागा, टाइम्स नाऊने १९८ जागा, हेडलाईन्स टुडेने १९१ जागा दाखवल्या होत्या. पण प्रत्यक्षात युपीएला त्या निवडणुकीत २६२ जागा मिळाल्या होत्या. डॉ. मनमोहन सिंग पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. याहीवेळी एक्झिट पोलचे अंदाज गडबडले होते.

उदाहरण चार - २०१४
२०१४ मधील निवडणुकीत देशात नरेंद्र मोदी यांची लाट होती, असे सगळेच म्हणतात. त्यावेळी एक्झिट पोलचे अंदाज बऱ्यापैकी खरे ठऱले होते. जवळपास सगळ्याच एक्झिट पोलनी त्यावेळी भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २८० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात एनडीएला त्यावेळी ३३६ जागा मिळाल्या होत्या आणि पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha election 2019 exit poll in past many times exit polls predictions found falls nda upa detail information