पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गौतम गंभीरला भाजपाची उमेदवारी, 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक

गौतम गंभीर

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या यादीत अपेक्षेप्रमाणे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला स्थान देण्यात आले आहे. या यादीत विद्यमान खासदार मीनाक्षी लेखी यांच्या नावाचाही समावेश आहे. गंभीर पूर्व दिल्ली तर मीनाक्षी लेखी या नवी दिल्ली मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान, गंभीरने आज (मंगळवार) रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले.

पूर्व दिल्लीत गंभीरचा सामना काँग्रेसचे अरविंदर सिंग लवली आणि आपच्या आतिशी मार्लेन यांच्याशी होईल. भाजपने दिल्लीतील ६ लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे. तर काँग्रेसनेही ६ जागांवरील आपले उमेदवार निश्चित केले आहेत. भाजपने उत्तर पश्चिम दिल्ली मतदार संघातील उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. हा मतदार संघ राखीव असून येथून उदित राज हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. 

भाजपने महेशगिरी यांच्या जागी पूर्व दिल्लीतून गौतम गंभीरला तिकीट दिले आहे. वर्ष २०१४ मध्ये नवी दिल्ली मतदार संघातून भाजपच्या  मीनाक्षी लेखी यांचा विजय झाला होता. त्यांना ४,५३,३०५ मते मिळाली होती. तर आपचे आशिष खेतान हे २,९०,६४२ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

विशेष म्हणजे सोमवारीच गौतम गंभीर पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये सहभागी झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळे प्रभावित झाल्याचे गंभीरने पक्ष प्रवेशावेळी म्हटले.