पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय राजकारणातील एका अध्यायाचा अंत - नरेंद्र मोदी

सुषमा स्वराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले आहे. मंगळवारी रात्री दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्या 67 वर्षाच्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे भाजपसह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. धडाडीच्या महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक राजकीय नेत्यांनी श्रध्दांजली वाहिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करुन सुषमा स्वराज यांना श्रध्दांजली वाहिली आहे. भारतीय राजकारणातील एका अध्यायाचा अंत झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे. भारतासाठी सुषमा स्वराज यांनी जे काही केले आहे ते संपूर्ण देशाच्या नेहमी लक्षात राहील. अशा दु:खद प्रसंगी त्यांच्या कुटुंब, समर्थक आणि चाहत्यांच्यासोबत मी असल्याचे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर, सुषमा स्वराज या उत्कृष्ट प्रशासक होत्या. त्यांनी जी मंत्रालयं सांभाळली तिथे त्यांनी चांगल्या प्रतीचे काम केले. जगातील वेगवेगळ्या देशांसोबत भारताचे संबंध सुधरवण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका बजावली. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना त्यांनी कायम मदतीचा हात दिला, असल्याच्या भावना मोदींनी व्यक्त केल्या आहेत.

भारतीय राजकारणातील एका अध्यायाचा अंत झाला आहे. जनतेच्या सेवेसाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी आपले जीवन अर्पण करण्याऱ्या एका उल्लेखनीय नेत्याच्या निधनाबद्दल भारत दु:ख व्यक्त करत आहे. सुषमा स्वराज या कोट्यावधी लोकांच्या प्रेरणास्थान होत्या, असे मत मोदींनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी सुषमा स्वराज यांना एक असाधारण वक्ता आणि उत्कृष्ट खासदार म्हटले आहे. सर्व राजकीय पक्षाचे नेते सुषमा स्वराज यांचे कौतुक आणि आदर करतात. त्यांची तब्येत ठीक नसतानाही त्या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न करायच्या, असे देखील मोदी यांनी म्हटले आहे.