पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभेच्या निकालानंतर लालूप्रसाद यादव यांची तब्येत बिघडली

लालूप्रसाद यादव

सध्या अटकेत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना रविवारी सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने आणि श्वास घ्यायला त्यांना त्रास होऊ लागल्याने काही वेळ चिंतेची परिस्थिती निर्माण झाली होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लालूप्रसाद यादव तणावामध्ये आहेत. ते सकाळी उशीरा उठतात. जेवण घेणे टाळतात आणि औषधेही घेत नाहीत. त्यांची तब्येत आणखी बिघडली आहे, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला या निवडणुकीत एकाही जागेवर यश मिळाले नाही. पक्षाचे सर्व उमेदवार लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरले आहेत. त्यांच्या मुलीलाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

बिहारमध्ये लालूंच्या पक्षाची अवस्था बिकट, सगळेच उमेदवार हारले

गेल्या काही दिवसांपासून लालूप्रसाद यादव यांची तब्येत नाजूक आहे. रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून त्यात आणखीनच भर पडली आहे. रविवारी सकाळी पाच वाजता त्यांच्या खोलीतील एसी बंद पडला. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे एसी बंद पडला. यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर लगेचच लालूप्रसाद यादव यांच्यावर उपचार करण्यात येणाऱ्या डॉ. डी. के. झा यांना बोलावून घेण्यात आले. सहा वाजता डॉ. झा रुग्णालयात आले. त्यांनी लगेचच लालूप्रसाद यादव यांना दुसऱ्या एका खोलीमध्ये नेले. तिथे त्यांची सखोल तपासणी करण्यात आली. लालूप्रसाद यादव यांच्या खोलीतील वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर लगेचच त्यांना परत त्यांच्या खोलीत नेण्यात आले.

दरम्यान, लालूप्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवी यांनी रुग्णालयात आपल्या पतीवर विषप्रयोग केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनीही आपल्या वडिलांवर अत्यंत वाईट पद्धतीने उपचार सुरू आहेत. पाकिस्तानमधील युद्धकैद्यांपेक्षा वाईट उपचार माझ्या वडिलांवर करण्यात येत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.