पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

kulbhushan jadhav verdict: आयसीजेच्या अंतिम निकालाकडे जगाचे लक्ष

कुलभूषण जाधव

हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेवर आज सुनावणी होणार आहे. नेदरलँडमधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज निकाल देणार आहे. या प्रकरणाच्या सुनावणीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता सुनावणी होणार आहे. प्रमुख न्यायाधिश अब्दुलकावी अहमद यूसुफ हे निकाल वाचून दाखवणार आहेत. 

निकालाकडे सगळ्याचे लक्ष

पाकिस्तानच्या न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी आणि दहशतवादीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानच्या या निर्णयाविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या १० सदस्यांच्या पीठाने १८ मे २०१७ मध्ये अंतिम निकाल येईपर्यंत जाधव यांची फाशीची शिक्षा थांबवण्याचे आदेश दिले होते. आज या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे. नेमका काय निकाल लागतो, कुलभूषण यांची पाकिस्तानकडून सुटका होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पाकची कायदेविषयक टीम दाखल

कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावर १८ फेब्रुवारीला हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयातील मुख्यालयामध्ये ४ दिवस सुनावणी सुरु झाली. जाधव यांच्या सुटकेसाठी भारताने केलेली याचिका फेटाळून लावण्यात यावी अशी मागणी पाकिस्तानने न्यायालयाकडे केली होती. दरम्यान, जाधव यांच्या प्रकरणावर आज अंतिम सुनावणी होणार असल्यामुळे पाकिस्तानची कायदेविषयक टीम मंगळवारीच हेग येथे पोहचली. पाकिस्तानच्या कायदेविषयक टीमचे नेतृत्व अर्टीर्नी जनरल अनवर मंसूर खान हे करत आहेत. त्याच्या टीमसोबत पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद फैसलदेखील उपस्थित आहेत. 

कोण आहेत कुलभूषण जाधव

कुलभूषण जाधव हे माजी नौदल अधिकारी आहेत. नौदलामध्ये १४ वर्ष सेवा केल्यानंतर त्यांनी मुदतीपूर्वीच निवृत्ती स्वीकारली होती. २००३ मध्ये ते नौदलातून निवृत्त झाले. कुलभूषण जाधव हे मुंबईचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जाधव यांचे पूत्र आहेत. सुधीर जाधव हे ९ वर्षांपूर्वी पोलीस दलातून निवृत्त झाले होते. कुलभूषण यांचे कुटुंबीय पवई येथील हिरानंदनी भागात राहतात.

या प्रकरणातील महत्वाचे मुद्दे -
 
१. कुलभूषण जाधव हे माजी नौदल अधिकारी आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने ते इराण येथे गेले होते. ३ मार्च २०१६ मध्ये बलुचिस्तान येथून पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. 

२. पाकिस्तानने दावा केलाय की, कुलभूषण जाधव हे रिसर्च अॅण्ड एनालिसिस विंग म्हणजेच 'रॉ'चे एजंट आहेत. २५ मार्च २०१६ ला पाकिस्तानने एक पत्रक जारी करत भारतीय अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांच्या अटकेची माहिती दिली होती. 

३. पाकिस्तानच्या न्यायालयाने हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली बंद कॅमेऱ्यात सुनावणी केली. त्यानंतर एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. 

४. पाकिस्तानी न्यायालयाच्या या निर्णयाला विरोध करत भारताने ८ मे २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. 

५. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १८ मे  २०१७ रोजी अंतिम निकाल येईपर्यंत जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली.

६. डिसेंबर २०१७ मध्ये कुलभूषण जाधव यांची आई अवंती जाधव आणि पत्नी चेतनकूल जाधव यांच्याशी पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या आघा शाही येथील पार्किंग लॉटमध्ये असलेल्या शिपिंग कंटेनरमध्ये भेट झाली.

७. कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट झाली. मात्र बंद काचेच्या खोलीमधून स्पीकरच्या माध्यमातून त्यांनी आई आणि पत्नीशी संवाद साधला. 

८. त्यानंतर १८ फेब्रुवारी २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये चार दिवस सुनावणी झाली. ज्यामध्ये भारताने आणि पाकिस्तान या दोन्ही देशाने न्यायालयासमोर आल्या बाजू मांडल्या. त्यावेळी न्यायालयाने निर्णय सुरक्षित ठेवत पुढील सुनावणी १७ जुलै रोजी देणार असल्याचे सांगितले होते. 

९. भारताने न्यायालयाला विनंती केली की, कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द केली जावी. तसंच त्यांच्या सुटकेचे आदेश लवकरात लवकर दिले जावेत. 

१०. दरम्यान, पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचे अपहरण केले असल्याचे भारताने न्यायालयाला सांगितले. कुलभूषण जाधव हे भारताचे निवृत्त नौसेना अधिकारी आहेत. ते व्यापाराच्या निमित्ताने इराणला गेले होते.