पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटकात सरकारला हलका दिलासा, ८ बंडखोरांचे राजीनामे चुकीच्या पद्धतीने लिहिलेले

के आर रमेश कुमार

कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यांपैकी फक्त पाचच आमदारांचे राजीनामे प्रमाणित मसुद्यानुसार आहेत. त्यामुळे केवळ तेच राजीनामे स्वीकारले जाऊ शकतात. उर्वरित ८ राजीनामे हे चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आले आहेत. त्यामुळे त्यावर कोणतीही कार्यवाही केली जाऊ शकत नाही, असे विधानसभेचे अध्यक्ष के आर रमेशकुमार यांनी म्हटले आहे. बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यावर पुढील निर्णय घेण्याची जबाबदारी रमेशकुमार यांच्यावरच आहे.

बंडखोर आमदारांनी दिलेले राजीनामे स्वेच्छेने आणि खरेपणाने दिलेले आहेत, हे आपल्याला पटले पाहिजे. तरच ते स्वीकारले जातील, असे रमेशकुमार यांनी याआधीच म्हटले होते. राजीनामा दिलेल्या एकूण १३ आमदारांपैकी ८ आमदारांचे राजीनामे योग्य पद्धतीने लिहिलेले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्याचे माजी गृहमंत्री रामलिंगा रेड्डी, गोपालैया, आनंद सिंग, नारायण गोडा आणि प्रताप गौडा यांनी दिलेले राजीनामे प्रमाणित पद्धतीनुसार लिहिलेले आहेत, असे रमेशकुमार यांनी सांगितले.

..अन्यथा परिणामाला सामोरे जा, सिद्धरामय्यांचा बंडखोरांना इशारा

या पाचही आमदारांना त्यांनी १२ आणि १५ जुलैला त्यांच्या राजीनाम्यावर चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. उर्वरित आठ आमदारांना पुन्हा एकदा प्रमाणित पद्धतीनुसार आपले राजीनामे द्यावे लागणार आहेत. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले रोशन बेग यांचा राजीनामा आज सकाळीच आपल्या कार्यालयाकडे आला असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांच्याकडून आपल्याला दोन पत्रे प्राप्त झाली आहेत. त्यामध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत कोणत्याही बंडखोर आमदारांनी राज्यपालांची भेट घेतलेली नाही, असेही रमेशकुमार यांनी सांगितले.