कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु झालेले राजकीय वादळ अजून शमण्याचे नाव घेताना दिसत नाही. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना राज्यपाल वजुभाई वाला यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेली आणखी एक मुदत संपली आहे. कुमारस्वामी सरकारवर बहुमत सिद्ध करण्यासाठी दबाव आहे. पण आज दुपारी दीड वाजताच्या मुदतीनंतर सांयकाळी ६ वाजता दिलेली मुदतही काँग्रेस-जेडीएस सरकारने पाळलेली नाही. दुपारची मुदत संपल्यानंतर राज्यपाल वजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना पुन्हा एकदा सांयकाळी ६ पूर्वी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते.
राज्यपाल विधानमंडळाचे लोकपाल म्हणून काम करु शकत नाहीत, असे कुमारस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देताना सभागृहात म्हटले. मी राज्यपालांवर टीका करणार नाही. राज्यपालांना कालमर्यादा निश्चित करण्याचा अधिकार आहे की नाही, हे निश्चित करण्याची मी विधानसभाध्यक्षांनाच विनंती करतो. यावेळी काँग्रेस आमदारांनी राज्यपाल परत जा, अशा घोषणा दिल्या.
दरम्यान, सभागृहाचे कामकाज कसे चालवायचे, हे राज्यपाल ठरवू शकत नाही, असे कर्नाटकमधील मंत्री कृष्णा बायरेगौडा यांनी शुक्रवारी सभागृहातच सांगितले. त्यावरून राज्यपाल विरुद्ध सरकार असाही कंगोरा कर्नाटकमधील राजकीय पेचाला जोडला जाण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, विश्वासदर्शक प्रस्ताव ही सभागृहाची कामकाज पद्धती आहे. सभागृहाचे कामकाज कसे चालवायचे हे राज्यपाल ठरवू शकत नाहीत.