कर्नाटकमधील १५ विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. या पोटनिवडणुकीच्या निकालावरच कर्नाटकमधील भाजपच्या सरकारचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे भाजपने या पोटनिवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत. कर्नाटकमधील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
'पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव पक्षातील लोकांमुळेच'
सकाळी सात वाजता एकूण १५ विधानसभा मतदारसंघातील मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. सकाळपासूनच या मतदारसंघात मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळते आहे.
कर्नाटकमधील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) सरकारवेळी एकूण १७ आमदारांनी अचानक आपल्या विधानसभा सदस्यत्वाचे राजीनामे दिले होते. त्यानंतर तत्कालिन विधानसभा अध्यक्षांनी या सर्व आमदारांना अपात्र ठरविले होते. त्यांना पोटनिवडणूक लढविण्यासही अपात्रतेच्या कारवाईमुळे निर्बंध घालण्यात आले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या निकालात राजीनामा दिलेले सर्व आमदार पोटनिवडणूक लढवू शकतात, असे स्पष्ट केल्यामुळे अपात्र आमदारांना दिलासा मिळाला होता. भाजपला मदत करण्यासाठीच या सर्व आमदारांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर कर्नाटकमध्ये सत्ताबदल होऊन भाजपचे बी एस येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते.
हिवाळ्यात पावसाळा; मुंबईत पावसाच्या हलक्या सरी
ज्या १५ ठिकाणी आज मतदान होते आहे. त्यापैकी १२ ठिकाणी गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. तर तीन ठिकाणी जेडीएसचे उमेदवार विजयी झाले होते. आता पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने सर्व १५ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर जेडीएसने १२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. एकूण १५ जागांसाठी १६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी १५६ पुरुष उमेदवार आहेत तर ९ महिला उमेदवार आहेत.