पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेसमध्ये पडद्यामागे बोलणी, त्रिशंकू लोकसभेनंतरची तयारी

के. चंद्रशेखर राव

लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे संपले असून, अखेरचे दोन टप्पे शिल्लक आहेत. पण मतमोजणीनंतर येणाऱ्या निकालांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये चर्चांना, वाटाघाटींना सुरुवात झाली आहे. यामध्ये सध्यातरी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आघाडीवर आहेत. ते तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असले, तरी दुसरीकडे त्यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी सुरू केली आहे. मतमोजणीनंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्त्वात आली तर त्यावेळी प्रादेशिक पक्षांचे महत्त्व जास्त असणार आहे. हे समजून त्यांनी आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. सध्या तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेस यांच्यामध्ये पडद्यामागे वाटाघाटी सुरू असल्याचे या घटनेशी संबंधित दोन सूत्रांनी सांगितले.

तेलंगणामध्ये पहिल्या टप्प्यातच लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यानंतर साधारणपण दहा दिवसांनी तेलंगणा राष्ट्र समितीच्या एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. दोन्ही पक्षातील नेत्यांनी ही भेट झाल्याचे नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर 'हिंदूस्थान टाइम्स'च्या प्रतिनिधीकडे मान्य केले.

मोदींचे अच्छे दिन संपले, वाईट दिवस सुरू - मायावती

काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्र समिती यांच्यामध्ये आघाडी होण्यास अद्याप खूप वेळ आहे. पण केवळ शक्यतांची चाचपणी सध्या केली जात आहे. काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांच्या मदतीशिवाय तिसऱी आघाडी स्थापन करून त्या माध्यमातून गरज पडल्यास केंद्रातील सरकार चालविण्याचे प्रयत्न प्रादेशिक पक्षांकडून करण्यात येत आहेत. तेलंगणा राष्ट्र समिती यासाठी आग्रही होती. पण केंद्रात सत्ता स्थापन करताना भाजप किंवा काँग्रेस या पैकी एकातरी राष्ट्रीय पक्षाची मदत घ्यावीच लागेल, असेही दिसून आले आहे. कारण तसे न केल्यास नवे सरकार फार काळ टिकू शकणार नाही. १९९६ मधील संयुक्त आघाडी सरकारचा प्रयत्न जसा जास्त दिवस टिकला नाही. तसेच या सरकारचे होईल, असेही म्हटले जाते आहे.

भाजपशिवाय सरकार केंद्रात सत्तेवर आणण्यासाठी काँग्रेस गेल्या वर्षभरापासून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटत आहे. यामध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीबाहेरील काही पक्षांचाही समावेश आहे. पण तेलंगणा राष्ट्र समितीच्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला नव्हता.

मोदीजी, तुमची कर्म तुमची वाट पाहताहेत; राहुल गांधींचे प्रत्युत्तर

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यानंतर तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेसमधील पडद्यामागील भेटींना सुरूवात झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांचे विरोध आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी आणि के. चंद्रशेखर राव यांच्यामध्येही पडद्यामागे बोलणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या २५ तर तेलंगणामध्ये १७ जागा आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीने स्पष्ट बहुमत मिळवले होते.