पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Delhi Election Results: भाजपसाठी दिल्ली निकालाचा अर्थ काय ?

भाजप

नवीन वर्ष, नवीन पक्षाध्यक्ष यामुळे उत्साहित असलेल्या भाजपला दिल्लीच्या निकालाने मोठा धक्का बसला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाला (आप) बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, त्यावेळी भाजपचे नेते छातीठोकपणे भाजपचीच एकहाती सत्ता येईल असा दावा करत होते. दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी एक्झिट पोलचे दावे खोडत भाजप ४८ हून अधिक जागा जिंकेल माझे टि्वट जपून ठेवा अशी दर्पोक्ती केली होती. अखेर मंगळवारी सर्व दावे फोल ठरले आणि 'आप'ने निर्विवाद वर्चस्व राखले. गतवेळीपेक्षा कमी जागा जरी मिळाल्या असल्या तरी 'आप'चे हे यश खूप मोठे आहे. 

Delhi Results : दिल्ली भाजपच्या कार्यालयात लागले सूचक संदेश असलेले पोस्टर

ही निवडणूक भाजपसाठी विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले होते. दिल्लीत तर सातही लोकसभा मतदारसंघात भाजपला यश मिळाले. परंतु, त्यानंतर झालेल्या काही राज्यातील विधानसभा निवडणुकीत हरयाणा वगळता भाजपला कुठेच यश मिळाले नाही. हरयाणामध्ये दुष्यंत चौटालांच्या पाठिंब्याने त्यांना सरकार स्थापन करावे लागले. हे दुष्यंत चौटाला तेच ज्यांनी निवडणूक प्रचारात भाजपवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. 

दुसरीकडे झारखंड, महाराष्ट्रमध्ये सत्ता गमवावी लागली तर दिल्लीमध्ये २० वर्षांनंतर सत्तेत येण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. 

स्थानिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष
भाजपसाठी या सर्व निवडणुकांमध्ये एक गोष्ट समान होती. त्यांनी या सर्व निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्द्यांचा प्रचारात उल्लेख न करता राष्ट्रीय मुद्द्यांवरच भर दिला. विरोधी पक्षांनी नेमके याच्या उलट केले. विरोधी पक्षांनी स्थानिक मुद्द्यांसह बेरोजगारी, अर्थव्यवस्थेवरील संकटांवर भर दिला. भाजपला या मुद्द्यावर बचाव करण्यात अपयश आल्याचे बोलले जाते. 

दिल्लीत काँग्रेस निराशाजनक कामगिरी करणार माहिती होते - संदीप दीक्षित

आता येत्या काही महिन्यांत पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपला या राज्यांच्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणनीती बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येकवेळी कलम ३७०, राम मंदिर, सीएए या राष्ट्रीय मुद्द्यांचा वापर करुन निवडणुका जिंकता येणार नाहीत हे या निवडणुकांनी भाजपला दाखवून दिले आहे. नागरिकांना स्थानिक प्रश्नांमध्ये रस आहे. 

सीएए-एनआरसीचा मुद्दा
दिल्ली विधानसभा निवडणुकीत सीएए-एनआरसीचा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरला. जामिया मिलिया विद्यापीठ, जेएनयू विद्यापीठात झालेले हिंसक आंदोलन, गोळीबार, शाहिन बागमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाचा राजकीय लाभ मिळेल असा अंदाज भाजपचा होता. परंतु, निकालामुळे याचा काहीच फायदा झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील ३ जागांवरुन भाजप ७ वर येऊन पोहोचली आहे. याचा भाजपला विचार करावा लागेल. 

विकासाविरुद्ध राष्ट्रवाद
भाजपने मागील काही विधानसभा निवडणुकांपासून राष्ट्रवादाचा मुद्दाच उचलून धरला आहे, असे दिसते. भाजपच्या धोरणांना विरोध म्हणजे देशद्रोहीपणा असा प्रचार केला गेला. नागरिकांना ते पसंत पडल्याचे दिसत नाही. विरोधकांनी विकासाचा मुद्दा उचलून धरला. दिल्लीच्या निवडणुकीत तर भाजपने हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान असा प्रचारच केला होता. हिंदुस्थानसाठी भाजपला मतदान करा, असे आवाहनच त्यांनी केले होते. निवडणुकीचे निकाल स्पष्ट होताच, 'आप'ने हाच मुद्दा अधोरेखित केला आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. विकासविरुद्ध राष्ट्रवाद हाच प्रचाराचा केंद्रबिंदू ठरला. आपने गेल्या ५ वर्षांतील विकासकामांची जंत्री लोकांसमोर मांडली. भाजपने पुन्हा तेच राष्ट्रवादाचे मुद्दे समोर आणले. 

भारताचा आत्मा वाचवल्याबद्दल दिल्लीवासीयांचे आभारः प्रशांत किशोर

लोकसभेत साथ मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाकडे पाठ
मागील काही निवडणुकांमध्ये पक्षाला अपयश येऊनही भाजपने आपल्या निवडणुकीतील रणनीतीत बदल केल्याचे दिसत नाही. हातातली राज्ये चाललीत. नवीन राज्ये मिळेनात, अशी अवस्था भाजपची झाली आहे. लोकसभेत घवघवीत यश मिळवणाऱ्या भाजपला विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र म्हणावे तसे यश मिळताना दिसत नाही. भाजपच्या मतांची टक्केवारी वाढत आहे, त्यांचा स्ट्राईक रेट वाढत आहे. पण सत्ता मिळवण्यात पक्षाला अपयश येत आहे. लोकसभेत मोदींना साथ देणारी जनता विधानसभेत पक्षाला मतदान का करत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- दिग्विजय जिरगे

divijay.jirage@gmail.com