पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींच्या 'त्या' निर्णयामुळे ममता बॅनर्जी शपथविधीला जाणार नाहीत

ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचारात मृत पावलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करण्याच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांनी या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये कोणताही राजकीय हिंसाचार झालेला नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला.

पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा निवडणुकीत राजकीय हिंसाचारात मृत पावलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय ममता बॅनर्जी यांना आवडलेला नाही. त्यांनी तातडीने पत्रक प्रसिद्ध करून पश्चिम बंगालमध्ये कसलाही राजकीय हिंसाचार झालेला नसल्याचे म्हटले आहे. राज्यात ज्या हत्या झाल्या, त्या वैयक्तिक द्वेषातून, कौटुबिक रागातून किंवा इतर कारणामुळे झाल्या असण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले आहे. राजकीय हिंसाचार झाल्याचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

नरेंद्र मोदी यांनी आपल्या निर्णयामुळे मला शपथविधी सोहळ्याला न जाण्यास प्रवृत्त केले आहे. मी या सोहळ्याला जाऊ शकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. देशाच्या पंतप्रधानांचा शपथविधी हा घटनात्मक कार्यक्रम असतो. पण या कार्यक्रमाचा वापर जर कोणी राजकीय फायदा घेण्यासाठी करणार असेल, तर मी त्यात सहभागी होऊ शकणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारी शपथविधी सोहळा हा औपचारिक कार्यक्रम असून मला या कार्यक्रमाचे निमंत्रण आले आहे. त्यामुळे मी उपस्थित राहणार आहे, असे त्यांनी माध्यमांना सांगितले होते. मात्र आता त्यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. 

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले होते. दोन्ही नेत्यांनी जाहीर सभांमध्ये एकमेकांवर कडव्या शब्दांत टीका केली होती.