देशाच्या आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक जिल्ह्यांना आधीच्या सरकारने विकासात मागे सोडले होते. पण आमच्या सरकारने या जिल्ह्यांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले. अशा ११२ जिल्ह्यांना विकसात इतरांच्या बरोबरीने आणण्याचे काम आमच्या सरकारने सुरू केले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले. नवी दिल्लीमध्ये हिंदुस्थान टाइम्स लीडरशीप समिटच्या उदघाटनात बीजभाषण करताना त्यांनी विकासाची आपली भूमिका मांडली.
नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील या ११२ जिल्ह्यांमध्ये बँकिंग, विमा सुरक्षा, वीज जोडणी, आरोग्य सुविधा, माता मृत्यूवर नियंत्रण यावर काम केले जाते आहे. केंद्रातील अधिकारी या ठिकाणी जाऊन तेथील नागरिकांना या सुविधा लवकरात लवकर कशा मिळतील, यावर काम करताहेत. आम्हाला पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सवर काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. आधीच्या सरकारच्या काळात पॉलिटिक्स ऑफ प्रॉमिसेस सुरू होते. निवडणुका आल्या की नव्या रेल्वे लाईनची घोषणा व्हायची, गरिबी हटावचा नारा नव्याने दिला जायचा, रस्त्यांची घोषणा केली जायची. पण देशातील लोक या प्रकारच्या घोषणा आता समजू लागले आहेत, असे त्यांनी सांगितले.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
आमच्या सरकारने बँकिंग क्षेत्र अधिक मजबूत करण्यावर भर दिला. बँकांच्या पुनर्भांडवलीकरणाचे काम आम्ही केले. बँकांना सशक्त करण्याचे काम केले.
पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी सरकार काम करते आहे.
लोकांच्या आयुष्यात सरकारची दखल जेवढी कमी आणि सुशासन जास्त तेवढा देश लवकर पुढे जाईल.
२१ व्या शतकात आपण १९ व्या आणि २० व्या शतकातील नियमांनुसार काम करीत होतो. मानसिकता त्याच पद्धतीची होती. आम्ही सर्वात आधी ती मानसिकता आणि नियम बदलण्याचे काम केले.