पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी; शाळांना सुट्टी जाहीर

हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हवामान बदलानंतर जोरदार बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीसह गढवाल आणि कुमाऊं मंडल येथे जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. तर नैनीताल, धनोल्टी, औली आणि चकराता येथे देखील बर्फवृष्टी सुरु आहे. अनेक भागात थांबून थांबून बर्फवृष्टी होत असून २ ते ४ फूटापर्यंत बर्फ साचला आहे.

बर्फवृष्टीमुळे औली, गंगोत्री-यमुनोत्री महामार्गासह अनेक महामार्ग बंद झाले आहेत. चमोली आणि उत्तरकाशीमध्ये अनेक गावांचा मुख्य रस्त्यांपासून संपर्क तुटला आहे. धानाचूलीमध्ये बर्फवृष्टीमुळे लोहाघाट-देवीधुरा मार्ग बंद झाला असून तीन बस अडकल्या आहेत. महामार्गावरील बर्फ हटवण्याचे काम सुरु आहे.

गुरुवारी पहाटे ५ वाजल्यापासून सुरु असलेली बर्फृवृष्टी शुक्रवारी देखील सुरुच आहे. हवामान खात्याने जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने अलर्ट जारी केला आहे. येत्या ४८ तासामध्ये अशीच बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचसोबत शुक्रवारी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.   

बर्फवृष्टीला सुरुवात झाल्यामुळे हिमाचल प्रदेशसह उत्तराखंडमधील अनेक पर्यटनस्थळी पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. बर्फवृष्टीमुळे सगळीकडे सफेद चादर परसली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्फवृष्टीमुळे शिमला जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांशी संपर्क तुटला आहे.