पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

अरुण जेटली (Sonu Mehta/HT File PHOTO)

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज (शनिवार) निधन झाले. त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुपारी १२.०७ वाजता अखेरचा श्वास घेतला. ते ६६ वर्षांचे होते. त्यांना ९ ऑगस्ट रोजी श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे. 

त्यांच्या फुफ्फुसात पाणी जमा होत होते. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना सॉफ्ट टिशू सरकोमा झाला होता. हा एकप्रकारचा कर्करोग आहे. त्यांना मधुमेहही होता. त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाचीही शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. वाढत्या वजनापासून सुटका करण्यासाठी त्यांच्यावर बॅरिएट्रिक शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.  

दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी नेत्याच्या रुपात राजकीय कारकीर्द सुरु करणारे जेटली हे सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकीलही होते. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे जेटली प्रकृती अस्वास्थ्यामुळे मोदी-२ सरकारमध्ये सहभागी झाले नव्हते. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांनी कायदा आणि जलवाहतूक मंत्रालयाचा कारभार पाहिला होता.

त्याचा गणती देशातील निष्णात वकिलांमध्ये होती. ८० च्या दशकात जेटलींनी सर्वोच्च न्यायालयात आणि देशातील अनेक विद्यापीठात महत्वाचे खटले लढवले. १९९० मध्ये त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकिलाचा दर्जा देण्यात आला. व्ही पी सिंह सरकारने त्यांना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पद दिले होते.