पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

शीला दीक्षित

काँग्रेसच्या नेत्या आणि तब्बल तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. दिल्लीमध्येच खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अजय माकन यांनी दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीवेळी शीला दीक्षित यांच्याकडेच दिल्लीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना या महानगरात विकासाची अनेक कामे हाती घेण्यात आली होती. १५ वर्षे त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. दिल्ली मेट्रोचा विस्तार, कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्ताने झालेली विकासकामे यावेळी शील दीक्षितच दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. गांधी कुटुंबियांशी त्यांचे चांगले संबंध होते. विशेषतः युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीय म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या. काही दिवसांपूर्वीपर्यंत त्या काँग्रेस पक्षाच्या कामात सक्रिय होत्या. काही दिवसांपूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांची भेट घेतली होती.

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्य असताना त्या स्पष्टपणे आपली भूमिका मांडत होत्या. लोकसभेतही त्यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले होते. केरळच्या राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. 

शनिवारी सकाळीच त्यांना दिल्लीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. शीला दीक्षित यांच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.