पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीः एम्स रुग्णालयात भीषण आग

दिल्लीः 'एम्स'मध्ये मोठी आग, अग्निशामक दलाचे ३४ बंब घटनास्थळी (HT PHOTO.)

दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) मोठी आग लागली आहे. ही आग शनिवारी सांयकाळच्या सुमारास लागली. आग लागल्याचे समजताच परिसरात एकच गोंधळ उडाला. टीचिंग ब्लॉकमध्ये ही आग लागल्याचे सांगण्यात येते. हा ब्लॉक इमर्जन्सी विभागाजवळ आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सांयकाळी एम्समधील टीचिंग ब्लॉकच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. ३४ बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार जीवितहानी झाली नसल्याचे समजते. आग लागताच संपूर्ण इमारत रिकामी केली. आगीमुळे किती नुकसान झाले, याची माहिती संपूर्ण आग विझविल्यानंतरच समजेल.

सुदैवाने शनिवार असल्याने रुग्णालयात इतर दिवसांच्या तुलनेत कमी गर्दी होती. विशेष म्हणजे, यापूर्वी एम्समधील ट्रामा सेंटरमध्ये मार्च महिन्यात आग लागली होती. त्यावेळी रुग्णांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. 

वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता आहे. आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट निर्माण झाले होते. आग लागलेल्या ठिकाणी प्राध्यापकांचे केबिन आणि प्रयोगशाळा असल्याचे सांगण्यात येते.