पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींना पर्याय शोधणे वाटते तितके सोपे नाही कारण की...

राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम राहिले तर पक्षापुढील पेच आणखीनच वाढणार असल्याचे दिसते आहे. कारण त्या स्थितीत नवीन अध्यक्ष शोधणे वाटते तितके सोपे नक्कीच नाही. त्यामुळेच राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये, यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी सर्वच ज्येष्ठ नेते प्रयत्नशील आहेत.

राहुल गांधी यांच्याशिवाय पक्षाच्या अध्यक्षपदासाठी सर्वस्वीकृत चेहरा सध्या पक्षाकडे नाही, असे ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. माजी केंद्रीय मंत्री ए. के एँटनी किंवा सुशीलकुमार शिंदे यांचे नाव घेतले जात असले, तरी त्यामध्ये केवळ चर्चा आणि शक्यतांपलीकडे काहीही अधिकृत नाही. अशोक गेहलोत जर राजस्थानचे मुख्यमंत्री नसते, तर त्यांचाही या पदासाठी विचार केला गेला असता, असे सूत्रांनी सांगितले.

राहुल गांधींच्या निवासस्थानी दिवसभर बैठका, काय घडले हे गुलदस्त्यात

माजी केंद्रीय पी चिदंबरम यांना दक्षिणेतील ज्येष्ठ नेते मानले जात असले, तरी संपूर्ण पक्षात त्यांची स्वीकारार्हता नाही. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे सुद्धा पंजाबमधील राजकारणातच जास्त आनंदी आहेत. तूर्ततरी राहुल गांधी यांच्याकडून त्यांना पर्याय म्हणून कोणत्याही नावाची शिफारस केली गेली नाही. त्यामुळेच राहुल गांधीच या पदावर कायम राहावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला ममता बॅनर्जी जाणार

राहुल गांधींना जवळून ओळखत असलेल्या नेत्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी जर एखादी गोष्ट ठरवली तर त्या निर्णयापासून त्यांना रोखणे शक्य नाही. ते शक्यतो आपला निर्णय परत फिरवत नाहीत. आता केवळ प्रियांका गांधी यांच्याकडूनच पक्षाला अपेक्षा आहेत. प्रियांका गांधींचे म्हणणे ते ऐकतील, असे पक्षातील नेत्यांना वाटते.
जर राहुल गांधींच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेला गोंधळ असाच राहिला, तर राज्यातील पक्षाच्या कारभारावर त्याचा परिणाम होईल. राज्यातील नेते डळमळीत होतील आणि ते इतर पक्षांकडे जाऊ शकतील, असे सूत्रांनी म्हटले आहे.