पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनमोहन सिंग पुन्हा राज्यसभेत जाणार, पण...

मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठविण्यासाठी काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत मनमोहन सिंग हे पुन्हा एकदा राज्यसभेत परतणार आहेत. जूनमध्ये त्यांचा आधीच्या सदस्यत्वाचा कालावधी संपुष्टात आला होता.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. येत्या २६ ऑगस्ट रोजी ही निवडणूक होणार आहे. भाजपचे राजस्थानमधून आलेले सदस्य मदनलाल सैनी यांच्या निधनामुळे ती जागा रिक्त झाली आहे. तर उत्तर प्रदेशमधून समाजवादी पक्षातून राज्यसभेवर निवडून गेलेले नीरज शेखर यांनी सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या दोन जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 

EVM वर आंदोलनाऐवजी विरोधक जनतेत गेले तर सहानुभूती मिळेल - फडणवीस

नीरज शेखर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागेवर पुन्हा आपल्यालाच उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशातून भाजपकडून त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या सदस्यत्वाची मुदत नोव्हेंबर २०२० मध्ये संपते आहे. 

दुसरीकडे राजस्थान विधानसभेत काँग्रेसकडे जास्त जागा असल्यामुळे तेथील रिक्त जागेवर आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणणे काँग्रेसला सहज शक्य आहे. यासाठीच पक्षाने मनमोहन सिंग यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठविण्याचे निश्चित केले आहे. ते निवडून आल्यावर एप्रिल २०२४ पर्यंत राज्यसभेत राहतील. 

राम मंदिर प्रश्नावर एकमत नाही, मध्यस्थ समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टात

माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर १९९१ मध्ये मनमोहन सिंग पहिल्यांदा आसाममधून राज्यसभेत निवडून गेले होते. त्यानंतर चार वेळा ते याच राज्यातून राज्यसभेत निवडून गेले आहेत. पण आता आसाममध्ये काँग्रेसकडे केवळ २५ आमदार असल्यामुळे तेथून परत मनमोहन सिंग यांना राज्यसभेवर पाठविणे शक्य नसल्याने त्यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठविण्यात येणार आहे.