पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींच्या विमानात बिघाड, पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरविले

राहुल गांधी

बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी निघाले असताना विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना शुक्रवारी पुन्हा दिल्लीला परतावे लागले. खुद्द राहुल गांधी यांनीच ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली. या ट्विटसोबत राहुल गांधी यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.

बिहारमधील समस्तीपूर, ओडिशातील बालासोर आणि महाराष्ट्रातील संगमनेर येथे राहुल गांधी यांच्या सभा आज होणार आहेत. त्यासाठी ते खासगी विमानाने शुक्रवारी सकाळी दिल्लीहून निघाले होते. पण विमानाने उड्डाण केल्यावर काही वेळातच इंजिनात बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यामुळे तातडीने विमान पुन्हा दिल्लीकडे वळविण्यात आले. सकाळी ९.३० मिनिटांनी विमान दिल्लीहून निघाले होते. परत १०.२१ मिनिटांनी ते दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. 

दरम्यान, विमानात बिघाड असल्याचे समजल्यावर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) अधिकारीही विमानतळावर पोहोचले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे, असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.