पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उठा उठा निवडणूक झाली, दिवाळी साजरी करण्याची वेळ आली

दिवाळी २०१९

दिवाळी म्हटलं की ठिकठिकाणी रंगीबेरंगी, विविध आकाराचे कंदील, मातीच्या पणत्या, रांगोळीचे विविध रंग, नवनवे कपडे, फटाके, फराळ असा माहोल पाहायला मिळतो. बाजारपेठा दिवाळीच्या खरेदीसाठी सजतात. दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची  अगदी झुंबड उडालेली असते. 

रस्त्याच्या कडेला लावलेले रंगीबेरंगी आकाश कंदील, तोरणं, विजेचे दिवे लक्ष वेधून घेतात. चिवडा, चकली, तूपातले लाडू, शेव यांचा खमंग वास वातावरणात दरवळत असतो. मात्र यावेळी दिवाळीचा हा उत्साह निवडणुकीच्या रणधुमाळीत कुठच्या कुठे विरला. गेल्या काही महिन्यांपासून ते अगदी दिवाळ सणाच्या आदल्या दिवसापर्यंत वातावरणाला दिवाळीपेक्षा राजकीय रंगच जास्त चढलेला पाहायला मिळाला. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, कार्यकर्त्यांची रात्रंदिवस मेहनत, चौका चौकात रंगलेल्या राजकीय चर्चा हेच  चित्र जिथे तिथे अधिक पाहायला मिळत होतं. 

assembly election results 2019 : विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

घरातील गृहिणी पुरुषमंडळींकडून मदतीच्या प्रतिक्षेत होत्या, मात्र  राजकीय बातम्या, टीव्हीवर झडणाऱ्या वाद विवाद चर्चा यापलिकडे दुसरं काहीच 'अहों'ना सुचत नसल्यानं  अनेकांच्या 'घरची स्वारी'ही वैतागली होती. पूर्वी दिवाळीच्या आधीपासूनच तयारी सुरूवात व्हायची. एकत्र फराळाच्या तयारीचा बेत रंगायचा. दिवाळीच्या आठवडाभर आधी सुरू होणारा उत्साह हा अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत कायम राहायचा. सणानिमित्तानं कुटुंबीय एकत्र येत. दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जायचे प्लान ठरायचे. मात्र बदलती जीवनशैली, विभक्त कुटुंबपद्धती  आणि अनेक कारणांमुळे दिवाळीची ती मज्जा कुठेच्या कुठे मागे राहिली.

सोशल मीडियावर रंगली रोहित पवारांच्या या कृतीची चर्चा

आजपासून दिवाळीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. धनत्रोयदशीपासून दिवाळसणाला सुरूवात होते. यादिवशी धनाची आणि धन्वंतरीची पूजा केली जाते. धन्वंतरी विष्णूचा अवतार आणि देवाचा वैद्य मानला जातो. सृद्ढ आरोग्याचं वरदान धन्वंतरी पूजेनं प्रात्प होतं अशी मान्यता आहे. खरं तर यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन सण एकत्र आल्यामुळे यंदाची दिवाळी तीन दिवसांची आहे.  दिवाळीआधी निवडणुका, नंतर निकाल आणि त्यात पावसाचं विरजण अशा चित्रात यंदाच्या दिवाळीचं अप्रुप काहीसं कमी झालं आहे. मात्र हे सारं तीन दिवस बाजूला ठेवायला  हरकत ती काय. निवडणुकांचे निकाल लागले तरी या दिवाळीला चढलेला राजकीय रंग अजूनही उतरला नाही. राज्यात सत्ता स्थापनेपर्यंत आरोप प्रत्यारोप, श्रेयवाद, हवे दावे  सुरुच राहतील. मात्र जाहिरातीतल्या 'अलार्म काका' सारखं 'उठा उठा दिवाळी आलीये' म्हणत आता आळस झटकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या दिवाळीचा भरपूर आनंद लुटा अन् नकारात्मक विचारांचा अंध:कार सकारात्मक प्रकाशनं दूर करा. तेव्हा आजपासून सुरू झालेल्या या दीपोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

Dhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ