पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG : सर्वाधिक मिस करतेय... चाळीतली दिवाळी आणि धम्माल मस्ती!

(छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )

दरवर्षी दिवाळी आली की काहीतरी चुकतंय, काहीतरी हातून निसटून जातंय असं राहून राहून वाटतंय. नेमकं काय हे समजत नाही. कदाचित लहानपणी जशी दिवाळी साजरी केली तीच मज्जा, ते दिवस, सारं काही आपण वर्तमानकाळात शोधू लागलोय असं वाटू लागलंय. ते खरंही आहे म्हणा. त्यामुळे 'शी आता दिवाळीत पूर्वीसारखी मज्जा येत नाही, लहानपणी आम्ही काय काय करायचो', असे विचार आपसूकच मनात येतात. अन् हळूच पावलं चाळीतल्या त्या दिवाळीतल्या दिवसांकडे वळू लागतात.

साधारण दसऱ्याला सुरू होणाऱ्या सहामाही परीक्षा दिवाळी सुट्टीच्या आदल्या दिवशीपर्यंत सुरू असायच्या. त्यामुळे या परीक्षांपासून कधी एकदा सुटका होऊन दिवाळीची सुट्टी सुरु  होते याचे वेध लागायचे. फारसं आठवत नाही पण बहुतेक दिवाळी सुरू होण्याआधी आठवडाभर सुट्ट्या सुरु व्हायच्या. शेवटच्या दिवशी बहुतेकदा चित्रकला, पर्यावरण किंवा हस्तकला असे पेपर असायचे. त्यामुळे दुपारी लवकर शाळा सुटायची, पण शाळा सुटताना उत्सुकता असायची ती 'दिवाळी अभ्यासाच्या वही'ची.

DIWALI 2019: म्हणून लक्ष्मी पूजनासाठी साळीच्या लाह्या आवश्यक

विविध विषयांचा समावेश त्यात असायचा. दिवाळीतल्या सुट्टीत वहीतले सर्व प्रश्न सोडवून शाळा सुरू झाल्यावर ती घेऊन यायची असा नियम होता. ती वही मिळाली की सर्वात शेवटचं पान मी पहिलं उघडायची. कारण शेवटच्या पानावर दिवाळीतल्या रांगोळ्या आणि छान छान चित्रे असायची. ही चित्रं रंगवण्यासाठी मुलांना देण्यात यायची. विविध प्रकारच्या टाकाऊपासून टीकाऊ हस्तकलांच्या कृती त्यात असायच्या. जो विद्यार्थी या हस्तकला करून आणेन, चित्र छान रंगवेल, वही सजवेल त्यांना बक्षीस असायचं.

दिवाळीच्या भेटवस्तू मिळाल्यावर जितका आनंद होत नसेल त्यापेक्षा कैकपटींचा आनंद ती दिवाळीची वही स्वीकारताना व्हायचा. शेवटचा पेपर संपला आणि घरी आलो की अगदी त्याच क्षणापासून दिवाळीची तयारी आमच्या घरात सुरु व्हायची. 'पेपर संपले, शाळेला सुट्टी आहे त्यामुळे आधी दप्तरं, पुस्तकं सगळं कपाटात बंद करू ठेवा', असा आई- पप्पांचा आदेश असायचा. क्षणाचा विलंब न करता दिवाळीची वही सोडली तर साऱ्या वस्तू कपाटात कोंडल्या जायच्या.

आमची मोठी चाळ होती. या चाळीत दोन कुटुंब सोडली तर सगळे मराठी आणि तेही कोकणातले आणि एकाच गावाचे अधिक होते. त्यामुळे आम्ही सारी कुटुंब एकमेकांशी अगदी घट्ट जोडलेलो होतो. दिवाळीआधी आमच्या चाळीत दरवर्षी एक गुजराती काकू आपल्या लहान मुलीला घेऊन रांगोळी विकायला यायची. डोक्यावर टोपली आणि त्यात विविध रंग. ती ओरडत आली की आम्ही सगळ्या मुली, चाळीतल्या मोठ्या ताई, बायका तिच्याभोवती गोळा होत.

DIWALI 2019: वसुबारस- अशी करा वासरासह गाईची पूजा

मी त्या गर्दीतून वाट काढत माझी कागदावर लिहिलेली रंगांची यादी तिच्या हातात द्यायचे. मात्र ती वाचण्याची तसदी तिनं कधीही घेतली नाही. आपल्या हिशोबानं ती रंग बांधून द्यायची तिला वाचता येत नाही याची जाणीवही त्यावेळी बालमनाला व्हायची नाही. ती साक्षर नसली तरी हिशोबाच्या बाबतीत अगदीच चोख होती. ती संपूर्ण चाळीत रंग विकेपर्यंत तिची छोटी मुलगी आम्हा मुलींमध्ये खेळत बसायची. तिला मराठी यायचं नाही पण शर्ट पँट किंवा फ्रॉक घातलेल्या आम्हा मुलींत ती पारंपरिक गुजराती वेशातली मुलगी खूप वेगळी दिसायची.
तास दीड तास आम्हा मुलांत खेळून झाल्यानंतर 'अगले साल फिर आऊंगी, तब हम बहौत खेलेंगे' म्हणत ती निघून जायची. आज या गोष्टीला १५ वर्षांहून अधिक वर्षे उलटली. मी तिला आणि तिच्या आईला पाहिलं नाही. आज रांगोळीचे रंग घेताना नेहमी 'अगले साल हम बहौत खेलेंगे' म्हणणाऱ्या त्या मुलीची आठवण आल्यावाचून राहत नाही.

त्या माय लेकी निघून गेल्यानंतर रांगोळीचे रंग व्यवस्थित डब्यात भरून ठेवण्यात, रांगोळीचे रंग पप्पांना कौतुकानं दाखवण्यात वेळ निघून जायचा. पप्पा संध्याकाळी घरी आले की 'दिवाळीचे कपडे घ्यायला चला ना' याचा तगादा लावायचो. आता जितकी गर्दी दादरमध्ये असायची तितकीच गर्दी पूर्वीही दिवाळीच्या काळात पाहायला मिळायची. त्या गर्दीच्या त्रासापेक्षा आपण नवीन कपडे घेणार याचा आनंद चेहऱ्यावर अधिक असायचा. आई -वडिलांच्या पसंतीचे फ्रॉक्स, त्यावर मँचिग बांगड्या, टिकल्या घेण्याची मज्जाच काही औरच होती.

त्यावेळी आम्हा मुलींचं कोणते कपडे घालायचं हे ठरलेलं असायचं. जो तो आपल्या आई -वडिलांसोबत जाऊन छान छान कपडे घेऊन यायचा. पण दिवाळी पहाट येईपर्यंत आपले नवीन कपडे कोणालाही दाखवू नये असा त्यावेळीही आमच्या बच्चेकंपनीचा नियम असायचा. त्यामुळे खरेदीवरून घरी परतल्यानंतर एखाद्या 'गुप्त मोहीमे'प्रमाणे आम्ही  कपडे लपवून घरी आणायचो. वाटेत शेजारच्या काकूंनी आई पप्पांना अडवलं आणि 'काय कपडे घेतले दाखवू पाहा' असं आईला म्हटलं आणि आईनं खरंच नवीन कपडे दाखवले तर? माझ्या कपड्यांचं सिक्रेट इतर मैत्रीणींना कळलं तर? त्यांनी इतरांना सांगितलं तर? नवीन कपड्यांची मज्जाच निघून जाईल ना, अशी भीती राहून राहून वाटायची. मात्र आता हे सारं आठवलं की किती अल्लड होतो आपण असं वाटून चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटतं.आता आणलेले ते भरजरी कपडे, साड्या पाहायला बालपणीच्या मैत्रिणी नाहीत, ना कौतुक करायला शेजारच्या काकू आहेत असा विचार आला की चेहऱ्यावरचे हसू कधी फिक्कं पडतं हेही कळत नाही.

दिवाळीच्या आदल्या रात्री उशिरा दाराबाहेर गेरू सारवण्याचा जणू सार्वजनिक कार्यक्रमच असायचा. चाळीच्या महिला घरातली काम आटोपली की आपापल्या दारासमोरील जागा पाण्यानं धुवून स्वच्छ करायच्या मग ती जागा वाळवून गेरू सारवत गप्पांचा फड रंगायचा. आम्ही बच्चे कंपनी इवलेसे डोळे मिटू लागले तरी त्यांच्या गप्पा ऐकण्यासाठी धडपडायचो. पुढे याच गप्पांमधले 'एक्सक्ल्यूझिव्ह' विषय आमच्या गॉसिप्सचे विषय ठरतं. रात्री उशीरापर्यंत रंगणाऱ्या गप्पांच्या कार्यक्रमाचा कंटाळा आला की 'उद्या चारला उठू' असं म्हणत आम्ही झोपी जायचो.

DIWALI 2019: यमदीपदान का व कसे करावे ?

रात्री उशीरापर्यंत जागरणं झाली तरीही मोती साबणातल्या अलार्म काकासारखे आम्ही बच्चे कंपनी दिवाळी पहाटला अगदी चारलाच उठायचो. आमच्या नऊ दहा मुलींपैकी एक मैत्रीण वयानं सर्वात मोठी होती. पप्पा चारलाच उठायचे त्यामुळे चारचा अलार्म वाजला की उठून मी चाळीतल्या माझ्या मैत्रीकडे जायचे. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या असं करत करत साडेचारच्या आधी साऱ्याजणी जागायच्या. हळूहळू सारी चाळ जायची. पहाटे चार वाजता चाळीतले आजोबा तुळशीबाहेर 'गोविंदा गोविंदा' म्हणत कारीट  फोडायचे. त्यांचा नमस्कार आटोपला की साडेचारच्या आधी मोठा रस्सी बॉम्ब लावून अख्या चाळीला जागं केलं जायचं. या कामात चाळीतील मोठी मुलं अव्वल होती. एक एक करत अंधारातली चाळ रंगीबेरंगी रोषणाई, कंदील पणत्यांच्या प्रकाशानं उजळून जायची.

पहाटे सारवलेल्या गेरूवर 'शुभ लाभ' आणि 'शुभ दीपावली' रांगोळीनं लिहिण्याची प्रथा होती. ती लिहून झाल्यावर अभ्यंगस्नान आटोपून नवीन कपडे घालून पाच वाजता चाळीतली सर्व लहान मुलं पिंपळाखाली जमत. पिंपळाखाली छोटंसं देऊळ होतं. तिथे पाया पडून आम्ही मुलं फटाके फोडायला सुरू करु.लवंगी, लक्ष्मी बॉम्बच्या माळा सुट्ट्या करुन ती एक एक फोडण्यात आम्हा मुलांची पहाट निघून यायची. हातात प्लास्टिकची पिशवी त्यात सुरसुरी, पाऊस, सुट्या केलेल्या लवंगी, भुईचक्र असा 'दारूगोळा' असायचा. जोपर्यंत लख्ख उजाडत नाही तोपर्यंत हे फटाके फोडण्याचा कार्यक्रम सुरू असायचा. चाळीतली सारी चिल्लीपिल्ली समोरच्या रस्त्यावर फटाके फोडण्यात रमायची. रस्त्याचा एक भाग मोठ्या मुलांसाठी होता. तिथे लहानांना जाण्याची परवानगी नव्हती. तिथे ते फटाक्यातले सुतळी बॉम्ब फोडायचे. मधला भाग लहान मुलांसाठी म्हणजे सुरसुरी पाऊस, लावणाऱ्या मुलांसाठी आणि तिसरा भाग आम्हा मुलींसाठी होता. जिथे सुट्या केलेल्या एक एक लवंग्या, लक्ष्मी बॉम्ब आम्ही फोडायचो. जी मुलगी लक्ष्मी बॉम्बची माळ फोडेल ती सर्वात धाडसी असा आमचा नियम असायचा.

सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेले पाच उमेदवार कोण माहितीये?

साधारण साडेसात आठनंतर सगळी हौस मौज पूर्ण झालेली असायची. मग रस्त्यावरून आमची टोळी आपापल्या घरी वळायची. सकाळी नऊ वाजल्यानंतर 'मधुमंजिरी आणि चेटकीण', किंवा 'पंचतंत्रा'तल्या गोष्टीवर आधारित बालनाट्य टीव्हीवर लागायची. ती सारी पाहण्यास आम्ही उत्सुक असायचो. ती बालनाट्य संपली की आमची स्वारी फराळावर ताव मारण्यासाठी अकराच्या सुमारास निघायची.प्रत्येकाच्या घरी जाऊन फराळ खाण्यात जी मज्जा यायची ती आता चांगल्या हॉटेलमध्ये जेवूनही यायची नाही. फराळाचा बेत संपला की बारानंतर हमखास कार्टून नेटवर्कवर रामायणावर आधारित कार्टून मूव्ही लागायचा. आम्ही दरवर्षी एखाद्याचं घर ठरवायचो आणि त्याच्या घरी जाऊन रामायणावरचा हा कार्टून मूव्ही पाहायचो.

राम -लक्ष्मणाच्या गोष्टी, सीता अपहरण, लंका दहन या सर्व गोष्टी तोंडपाठ असल्या तरी तो मूव्ही पाहण्यात कधीही कंटाळा यायचा नाही. मूव्ही संपला की खऱ्या अर्थानं आमच्या दिवाळी पहाटची सांगता व्हायची.  दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडीशी झोप आणि पुन्हा रांगोळीचा कार्यक्रम ठरायचा. रांगोळीचे पुस्तक, ठिपक्यांचा कागद आणून रांगोळीच्या नक्षी आम्ही मुली मुली ठरवायचो. कधी ठिपक्यांची, कधी फुलं, पानांची, मग कधीतरी फळांची परडी किंवा बदक, कबूतर राजहंसाच्या जोडीची रांगोळी दाराबाहेर रेखाटली जायची. रांगोळीचा छाप उमटवणं किंवा संस्कारभारतीच्या रांगोळींचं फॅड तेव्हा यायचं होतं. चित्रांच्या पुस्तकांतली विविध चित्रं किंवा मिकी माऊस, डोनाल्ड डक, ट्विटी, टॉम अँड जेरी या आवडत्या कार्टून कॅरेक्टरच्या रांगोळ्या दारासमोर असायच्या.

मनसेच्या एकमेव विजयी आमदाराचे कृष्णकुंजवर जल्लोषात स्वागत

दिवाळीच्या काळात काळोख लवकर पडायचा. अशावेळी आम्ही पंधरावीस टाळकी सहाच्या आधीच घोळक्यांनी सर्वांच्या दारात रांगोळी पाहायला फिरायचो. ज्यांची रांगोळी आवडली त्यांना आवर्जून घरात जाऊन सांगायचो. 'मुलींनो कडेकडेनं जा, रांगोळी पुसू नका' असे आवाज हमखास कानी पडायचे. सातनंतर पुन्हा मोर्चा फटाके फोडण्याकडे वळायचा. समोरच्या बिल्डींगमधले लोक त्यांच्या गॅलरीमधून मोठ्या कुतूहलानं आमच्याकडे पाहायचे.

आतासारखी चार दिवसांची दिवाळी आमची नक्कीच नव्हती. तुळशीच्या लग्नांपर्यंत दिवाळी सुरू असायची. त्यामुळे रोज संध्याकाळी नवी रांगोळी काढणं, घराबाहेर दिव्यांची रोषणाई करणं, संध्याकाळी फटाके फोडायला जाणं हा आमचा दिनक्रम तुळशीच्या लग्नापर्यंत सुरू राहायचा. मात्र या काळात आम्ही फटाके फारच बेतानं फोडायचो. कारण फटाके तुळशीच्या लग्नापर्यंत साठवून ठेवणं आवश्यक असायचं. तुळशीचं लग्न हा प्रकार आमच्या चाळीत दिवाळी पहाट इतकाच मोठा असायचा. तुळशीच्या वृंदावनाला धुवून रंगरंगोटी केली जायची. तिच्याभोवती सुरेख नक्षीदार रांगोळ्या रेखाटल्या जायच्या. याच चुरशीची स्पर्धा असायची. चाळीतल्या तरुण मुली आपल्या रांगोळी रेखाटण्याचं कसब पणाला लावायच्या. कारण संपूर्ण चाळ तुळशीच्या लग्नाला यायची त्यामुळे सजवलेल्या तुळशी वृंदावनाचं आणि त्या सजवणाऱ्या व्यक्तींचं भरभरून कौतुक व्हायचं.

तुळशीच्या लग्नाला आलेल्या प्रत्येकाला चिंचा, बोरं, आवळा, चुरमुरे, ऊस असा खाऊ मिळायचा. रात्री आठ वाजल्यापासून तुळशीच्या लग्नाला सुरुवात व्हायची. ती रात्री बारा वाजेपर्यंत लग्न चालायची. आम्ही मुलं नवीन कपडे घालून हातात रिकाम्या पिशव्या घेऊन तुळशीच्या लग्नाला जायचो. लग्न उरकली की चुरमुऱ्यांपेक्षा पिशवीत किती चिंचा, आवळे आलेत हे मोजण्यात मज्जा यायची. लग्न संपल्यानंतर उशीर व्हायचा. अनेकदा काही मस्तीखोर मुलं भूतांच्या गोष्टी सांगून आम्हा मुलांना घाबरुनही सोडायचे. त्यामुळे मागे न पाहता पळत घरी सुटणाऱ्या आम्हा छोट्या मुलांची फजिती पाहून मोठ्या मुलांना हसूही यायचं.

कोकण किनारपट्टीला 'क्यार' चक्रीवादळाचा धोका

भूताची भिती मनात असली तरी त्या दिवशी खाऊ म्हणून मिळालेला चिंचा बोरांचा आनंदही मोठा असायचा. त्या चिंचा बोरांच्या पिशवीकडे पाहून मिळणाऱ्या आनंदाची सर आता बोनस मिळाल्यावरही येत नाही हे खरं. आज आमची चाळ नाही. चाळीऐवजी तिथे इमारत उभी राहिली आहे. आमच्या बच्चेकंपनीपैकी कित्येकजण बाहेर गेलेत. काहींची लग्न झालीत. काहीजण बिल्डिंग सोडून निघून गेले. यातले माझ्यासारखे जे काही उरले सुरले आहेत ते दिवाळीच्या पहिल्या दिवशी आवर्जून नवीन कपडे घालून खाली येतात. खाली भेटल्यानंतरही मोबाईलमध्ये गढून गेलेल्या आजच्या मुलांकडे  आपसूक लक्ष जातं आणि तोंडात एकच वाक्य येतं.. शीSSSS, आत्ताच्या दिवाळीला पूर्वीसारखी मज्जा नाही!

प्रतीक्षा चौकेकर 

pratiksha.choukekar@htdigital.in