पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यासह देशभरामध्ये ईद उत्साहात

बकरी ईद

आज राज्यासह देशभरामध्ये बकरी ईद म्हणजेच 'ईद उल अज्हा' मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. ईद-उल- फितरनंतर मुस्लिम धर्मामध्ये हा दुसरा प्रमुख सण मानला जातो. मुस्लिम समाजात इस्लामी कालगणनेच्या शेवटच्या 'जिलहिज्जा'च्या १० तारखेला त्याग आणि बलिदानाची शिकवण देणारा हा सण आहे. इस्लामिक मान्यतेनुसार ईद-उल-जुहा हजरत इब्राहिमच्या कुर्बानीची आठवण म्हणून साजरा केला जातो. आज काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत ईद साजरी होत असून मुस्लिम बांधव या शुभ प्रसंगी मशिदीमध्ये जाऊन नमाज अदा करत आहेत. एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'ईद-उल-जुहा' च्या निमित्त सर्वांना शुभेच्छा. मला आशा आहे की यामुळे आपल्या समाजात शांती आणि समृद्धीची भावनांना मजबुती मिळेल, असे ट्विट करत मोदींनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिल्लीतल्या कश्मीरी गेट येथे असलेल्या पुंजा शरीफ मशिदीमध्ये नमाज अदा केली. त्यानंतर त्यांनी उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

भारत-बांग्लादेशच्या फुलबारी सीमेवर बकरी ईद साजरी करण्यात आली. बीएसएफच्या जवानांनी बांग्लादेशच्या जवानांना मिठाई भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बांग्लादेशच्या जवानांनी देखील भारतीय जवानांना मिठाई देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

श्रीनगरमधील वेगवेगळ्या भागातील मशिदीमध्ये मुस्लिम बांधवानी नमाज अदा करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. नमाज अदा केल्यानंतर ते एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये शांततेमध्ये ईद साजरी होत आहेत. श्रीनगरचे उपायुक्त शाहिद इकबाल चौधरी यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपालांच्या निर्देशानंतर ३०० विशेष टेलिफोन बूथ लावण्यात आले आहेत. जेणेकरुन मुस्लिम बांधव फोनवरुन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देऊ शकतील.

दिल्लीतल्या प्रसिध्द जामा मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करण्यासाठी मोदी गर्दी केली आहे. याठिकाणी ईदनिमित्त एकत्र आलेल्या मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

मुंबईत देखील ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मुंबईतल्या हमिदिया मशिदीसमोर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. यावेळी लहान मुलांपासून ते वयोवृध्द सहभागी झाले होते.

कोल्हापूरच्या शिरोळी येथे ईदनिमित्त मुस्लिम बांधवानी मशिदीमध्ये नमाज अदा केली. त्यानंतर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकमेकांना गळाभेट करत ईदच्या शुभेच्छा दिल्या.