दिल्लीतील ज्या धान्य बाजारात रविवारी पहाटे आग लागली तेथील गल्ल्या अत्यंत निमुळत्या आहेत. त्याचबरोबर जवळपास पाण्याचे साधनही नाही, त्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्यांना लांबून पाणी आणावे लागले, अशी माहिती आता समोर येत आहे. अग्निशामक दलाला जेव्हा आगीची माहिती देण्यात आली तेव्हा फक्त एका इमारतीला आग लागल्याचे सांगण्यात आले, त्या इमारतीत लोक अडकले आहेत याची माहितीच देण्यात आली नाही, असे घटनास्थळी दाखल झालेले उपमुख्य अग्निशामक अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, इमारतीच्या मालकाच्या भावाला ताब्यात घेण्यात आले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत ४३ जणांचा जीव गेला आहे तर अनेक जणांची प्रकृती गंभीर आहे.
दिल्लीत ४ मजली इमारतीला भीषण आग, ४३ जणांचा मृत्यू
Death toll rises to 43 in #Delhi fire incident, according to police. pic.twitter.com/FAYd3LNoOB
— ANI (@ANI) December 8, 2019
उपमुख्य अग्निशामक अधिकारी सुनील चौधरी म्हणाले की, ६०० चौ. फूटाच्या प्लॉटमध्ये आग लागली. इथे आतल्या बाजूस खूप अंधार आहे. येथे कारखाना असून तिथे स्कूल बॅग, बाटल्या आणि इतर साहित्य ठेवण्यात आले होते. रहिवासी भागात अवैधरित्या कारखाना चालू होता. जेव्हा अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले तेव्हा आतून वाचवा, वाचवा असा आवाज येत होता. जेव्हा खोल्यांचे दरवाजे उघडण्यात आले तेव्हा आतून लोक बाहेर आले. मृतांमध्ये बहुतांश लोक हे बिहारमधील बेगुसराय, समस्तीपूरसारख्या जिल्ह्यातील आहेत. तर काही मृत हे उत्तर प्रदेशमधील विविध जिल्ह्यातून असल्याचे सांगण्यात येते.
जर आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आत फसल्याचे समजले असते तर आम्ही मोठ्या संख्येने पथक आणले असते. त्यामुळे लोकही वाचले असते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.