काँग्रेस अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याशिवाय अन्य नाव शोधा, अशी भूमिका घेतल्यानंतर काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते मंडळी राहुल गांधी यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यात आता दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित देखील पुढे आल्या आहेत. राहुल गांधी यांनी राजीनामा देवू नये यासाठी त्यांनी आज (बुधवारी) राहुल गांधी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
राहुल गांधींना पर्याय शोधणे वाटते तितके सोपे नाही कारण की...
राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती शीला दीक्षित यांनी यावेळी केली. काँग्रेस पक्षाने यापूर्वीही कठिण परिस्थिती पाहिली आहे. त्यातून पक्ष पुन्हा उभारला आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाचे नुकसान होईल, असे शीला दीक्षित यांनी म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेल्या मानहानीकार पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला राजीनामा काँग्रेस कार्यकारणीकडे सोपवला होता.
राहुल गांधींच्या निवासस्थानी दिवसभर बैठका, काय घडले हे गुलदस्त्यात
राहुल गांधी यांचे मनवळवण्यासाठी शीला दीक्षित यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. तीनवेळा दिल्लीचे मुख्यमंत्री पद भुषवणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित काँग्रेस कार्यकर्त्यांचे नेतृत्व करत असून त्यांनी कार्यकर्त्यांची भावना राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहचवली आहे. यापूर्वी काँग्रेसमधील अनेक दिग्गजांनी यापूर्वी राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती केली होती. मात्र राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे शीला दीक्षित यांच्या प्रयत्नाला कितपत यश येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.