पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकारने गरिबांना वाऱ्यावर सोडले, चिदंबरम यांची टीका

पी चिदंबरम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची घोषणा केल्यानंतर काही मिनिटांतच काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी सरकारवर टीका केली. या कठीण प्रसंगात सरकाने गरिबांना वाऱ्यावर सोडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर टीका केली.

देशातील लॉकडाऊनमध्ये ३ मेपर्यंत वाढ, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

पी. चिदंबरम यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची गरज आहे, याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही या निर्णयाला पाठिंबा देतो. पण मुख्यमंत्र्यांनी आर्थिक निधी देण्याच्या केलेल्या मागणीवर अद्याप काहीच प्रतिसाद आलेला नाही. या संदर्भात २५ मार्चला जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये एका रुपयाचीही वाढ करण्यात आलेली नाही. रघुराम राजन यांच्यापासून जीन ड्रेझ आणि प्रभात पटनाईक यांच्यापासून अभिजित बॅनर्जी या सर्वांनी दिलेले सल्ले निरुपयोगी ठरले. 

लॉकडाऊनचे आधीचे २१ दिवस आणि आता नवे १९ दिवस या सर्वांमध्ये देशातील गरिबांना वाऱ्यावर सोडण्यात आले. त्यांना जेवणही मिळत नाही. सरकारकडे पैसे आहेत आणि धान्यही. पण सरकार या दोन्ही गोष्टी पुरवतच नाही. देशाच्या सद्यस्थितीबद्दल वाईट वाटते, असेही त्यांनी म्हटले आहे.

'कोरोनाविरोधात सर्वजण एकत्र, यापेक्षा मोठी देशभक्ती नाही'

नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणात मंगळवारी सकाळी लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पी. चिदंबरम यांनी हे ट्विट केले आहे.