पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... अखेर तो वादग्रस्त व्हिडिओ हटविला

व्हिडिओत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करण्यात आली होती.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका ट्विटर हँडलवरून छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांची तुलना अनुक्रमे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी करणारा वादग्रस्त व्हिडिओ अखेर हटविण्यात आला आहे. या व्हिडिओवरून मंगळवार सकाळपासून महाराष्ट्रात वाद सुरू झाला होता. पॉलिटिकल किडा ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला होता. हे ट्विटर हँडल व्हेरिफाईड नाही. ते कोण चालवते, हे सुद्धा स्पष्ट झालेले नाही. या व्हिडिओमध्ये भाजपचा प्रचार करण्यात आला असला, तरी त्या व्हिडिओशी आपला संबंध नसल्याचे भाजपने म्हटले. भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी ही माहिती दिली. 

'वाडिया रुग्णालयाचा निधी मिळेल, पण आंबेडकर स्मारक झालेच पाहिजे'

या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा वापर करण्यात आला होता. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन हा प्रकार सर्व संबंधितांपर्यंत पोहोचविला आहे. ते आता काय भूमिका घेतात, हे आम्हाला बघायचे आहे, असे म्हटले होते. शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनी या व्हिडिओवरून उद्वेगजनक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हा सर्व प्रकार अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय असल्याचे त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर म्हटले होते.

छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले की, आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये.

हवी तेवढी निदर्शने करा, CAA मागे घेणार नाही - अमित शहा

महाराष्ट्रात या व्हिडिओवरून वाद निर्माण झाल्यावर अचानक मंगळवारी संध्याकाळी तो संबंधित ट्विटर हँडल, युट्यूब चॅनेलवरून हटविण्यात आला.