पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाहिन्यांवरील चर्चेसाठी प्रवक्ते न पाठविण्याचा काँग्रेसचा निर्णय

रणदीप सुर्जेवाला

लोकसभा निवडणुकीत हार पत्करावी लागल्यानंतर काँग्रेस पक्ष अजूनही त्यातून पूर्णपणे सावरला आहे, असे म्हणता येणार नाही. एकीकडे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावरून सुरू असलेला गोंधळ अद्याप कायम आहे. तर दुसरीकडे पक्षाने आता एक नवा निर्णय घेतला आहे. पुढील महिनाभरासाठी काँग्रेसच्या कोणत्याही प्रवक्त्याने वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत सहभाग घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी गुरुवारी सकाळी त्यांच्या ट्विटर हँडलवरून याबद्दल माहिती दिली. 

कोणत्याही वृत्तवाहिनीवरील चर्चेसाठी काँग्रेसने पुढील महिनाभरासाठी प्रवक्ते न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे, एवढ्या एका ओळीत सुर्जेवाला यांनी आपले ट्विट केले आहे. कोणत्याही वृत्तवाहिनी किंवा संपादकाने पुढील महिनाभरासाठी त्यांच्या चर्चेसाठी काँग्रेसला निमंत्रित करू नये, असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मोदींच्या शपथविधीला सोनिया-राहुल गांधी उपस्थित राहणार

काही दिवसांपूर्वीच असाच निर्णय समाजवादी पक्षाने घेतला. वाहिन्यांवरील चर्चेसाठी पक्षाने तयार केलेला प्रवक्त्यांचा गट रद्द करण्यात आला. कोणीही पक्षाची पूर्वपरवानगी न घेता माध्यमांशी बोलू नये, असे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले होते. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसचे केवळ ५२ उमेदवार या निवडणुकीत यशस्वी ठरले आहेत. खुद्द राहुल गांधी यांना अमेठीतून पराभव पत्करावा लागला. काँग्रेस कार्यकारिणीच्या गेल्या शनिवारी झालेल्या बैठकीत त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला होता. पण कार्यकारिणीने तो एकमताने फेटाळला. पण त्यानंतरही राहुल गांधी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत.