पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकविरुद्धच्या युद्धांचे दाखले देत काँग्रेसने साधला PM मोदींवर निशाणा

सोनिया गांधी आणि नरेंद्र मोदी

काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पाकिस्तान विरोधात ब्र शब्द काढत नाहीत. या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसने पलटवार केला आहे.  पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी बिर्याणी आणि आंब्याचा खेळ बंद करा, अशा शब्दांत काँग्रेसने मोदींवर शाब्दिक तोफ डागली आहे. कर्नाटकमधील जाहीर सभेत सुधारित नागरिकत्व कायद्याचा मुद्दा उपस्थित करत भारतीय संसदेविरोधात आंदोलन करण्याऐवजी पाकिस्तानविरोधात आंदोलन करा, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर केली होती. त्यांच्या या वक्तव्याला काँग्रेसने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन उत्तर दिले आहे. 

'मोर्चेच काढायचेत तर पाकिस्तानातील अत्याचाराविरोधात काढा'

भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या युद्धातील विजयाचा दाखला देत काँग्रेसने सुधारित नागरिकत्व काद्यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेले आंदोलन हे संसदेविरोधातील नाही तर देशाचे तुकडे होऊ नयेत यासाठी आहे. आम्ही देशाचे तुकडे होऊ देणार नाही, असा उल्लेख काँग्रेसने ट्विटमध्ये केला आहे.  १९४८, १९६५, १९७१ आणि कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला ज्या जखमा दिल्या आहेत  त्यातून ते अजून सावरले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी बिर्याणी आणि आंब्याचा खेळ बंद करा, असा टोला काँग्रेसने मोदी सरकारला लगावला आहे.  

'प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथास मुद्दाम डावललं'

कर्नाटकमधील सभेत मोदी म्हणाले होते की,  पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवायांना आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडे पाडण्याची गरज आहे. मागील ७० वर्षांत पाकिस्तानने जी कृत्ये केली आहेत, त्याविरोधात आवाज उठवायला हवा. पाकिस्तानची निर्मितीच धर्माच्या आधारावर झाली आहे. पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांना त्रास दिला जातोय. पण काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पाकिस्तानविरोधात ब्र काढत नाहीत. त्याऐवजी तेथून येथे आलेल्या शरणार्थींविरोधात मोर्चे काढतात, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला होता.