पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुषमा स्वराज यांनी ती फी घेण्यासाठी हरिश साळवेंना घरी बोलावले होते आणि...

हरिश साळवे

सुषमा स्वराज यांच्याबद्दलची एक भावनिक आठवण ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी सांगितली आहे. मंगळवारी संध्याकाळीच हरिश साळवे यांचे फोनवरून सुषमा स्वराज यांच्याशी बोलणे झाले होते. त्यावेळी त्यांनी कुलभूषण जाधव यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात लढवून तो जिंकल्याबद्दलची नाममात्र एक रुपयांचे शुल्क घेण्यासाठी हरिश साळवे यांना बुधवारी घरी बोलावले होते. पण फोननंतर थोड्याच वेळात ह्रदयविकाराच्या झटक्याने सुषमा स्वराज यांचे निधन झाले. 

भारतीय राजकारणातील एका अध्यायाचा अंत - नरेंद्र मोदी

टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत हरिश साळवे यांनी ही आठवण सांगितले. ते म्हणाले, मी रात्री ८.५० वाजता त्यांच्याशी बोललो होतो. आमच्या दोघांमध्ये खूप भावनिक स्वरुपाचे बोलणे झाले. त्या मला म्हणाल्या की, तुम्हाला भेटायला यायला लागेल. तुम्ही जो खटला जिंकला, त्याचे शुल्क तुम्हाला द्यायचे आहे. त्यावेळी मी सुद्धा ते मौल्यवान शुल्क घेण्यासाठी मी सुद्धा उत्सुक असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या, उद्या संध्याकाळी सहा वाजता या, असे म्हणाल्या होत्या, अशी आठवण हरिश साळवे यांनी सांगितली.

पाकिस्तानमध्ये कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे दाद मागितली होती. हा खटला लढण्यासाठी भारताकडून हरिश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी या खटल्यासाठी नाममात्र एक रुपया शुल्क घेण्याचे जाहीर केले होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या खटल्यात कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला दिलेली स्थगिती कायम ठेवली. त्याचबरोबर कुलभूषण जाधव यांना भारताकडून राजनैतिक कायदेशीर स्वरुपाची मदत देण्याचे आदेश पाकिस्तानला दिले होते. भारतासाठी हा खटला अत्यंत महत्त्वाचा होता आणि त्यामध्ये हरिश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात केलेले युक्तिवाद खटल्याचा निकाल भारताच्या बाजूने लागण्यास उपयुक्त ठरले होते. 

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांचे भावस्पर्शी ट्विट

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निकाल हा भारताचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यावेळी सुषमा स्वराज यांनी दिली होती. या खटल्याच्या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज यांनी हरिश साळवे यांना भेटीसाठी बोलावले होते.