पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आसाममध्ये संतप्त निदर्शने, संचारबंदी लागू, लष्कर तैनात

आसाममध्ये तीव्र निदर्शने सुरू आहेत

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात गेल्या दोन दिवसांपासून आसाममध्ये संतप्त निदर्शने करण्यात येत आहेत. आसामच्या दहा जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आसाममध्ये परिस्थिती चिघळल्यानंतर तिथे लष्कराच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. निदर्शकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली असून, त्यांना रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांना गोळीबार करावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

शिवसेनेशिवाय अशा पद्धतीने भाजपने राज्यसभेत आपले आकडे वाढवले...

आसाममधील परिस्थिती चिघळल्यामुळे देशाच्या इतर भागांतून आसाममध्ये जाणारी काही विमाने आणि रेल्वे रद्द करण्यात आली आहेत. त्याचबरोबर आसाममधून बाहेर जाणारी विमानसेवाही तूर्त बंदच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी विमानतळावर अडकले आहेत. 

गुवाहाटीमध्ये बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी लष्कराच्या जवानांनी रस्त्यावर संचलन केले. जेणेकरून सामान्य लोकांमधील भितीचे वातावरण कमी होईल. आसामच्या काही भागांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

दिब्रूगढचे उपायुक्त पल्लव गोपाल झा म्हणाले, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. काल रात्री मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. त्यामुळे आम्हाला संचारबंदी लागू करावी लागली. लष्कर दाखल झाले आहे आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

रेस्तराँबाहेरचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकणे तरुणाला पडले महागात...

आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.