पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीन आला धावून, भारताला मदत म्हणून दिले पीपीई किट्स

भारतात आता पीपीई किट्सचे उत्पादन सुरू झाले आहे.

भारतात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मंगळवारी ४४०० च्या वर गेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्यसेविकांसाठी अत्यावश्यक पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स (पीपीई) चीनने मदतीच्या स्वरुपात भारताला दिले आहेत. 

चीनने सोमवारी एक लाख ७० हजार पीपीई किट्स भारताला दिले. कोरोना विषाणूशी लढत असलेल्या देशांना मदत करण्याच्या चीन सरकारच्या धोरणानुसार हे किट्स भारताला मदत स्वरुपात देण्यात आले. भारतात पीपीई किट्स  परदेशातून आयात केले जात होते. पण कोरोना विषाणूचा फैलाव जगभरात झाला असल्यामुळे निर्यातदार देशांनी हे किट्स निर्यात करण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर भारतात या किट्सच्या निर्मितीसाठी तयारी सुरू कऱण्यात आली.

भारतात आता पीपीई किट्सचे उत्पादन सुरू झाले आहे. काही उत्पादक कंपन्यांना त्यासाठी आवश्यक मंजुऱ्या देण्यात आल्या आहेत. सध्या काही कंपन्या सरकारला पीपीई किट्स उत्पादन करून देत आहेत. पण वेगवेगळ्या राज्यांकडून रोज केली जाणारी मागणी आणि त्याप्रमाणात त्यांना पीपीई किट्स पुरविण्यासाठी चीनकडून मिळालेले किट्स उपयुक्त ठरणार आहेत. 

सध्या देशात महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा या राज्यांमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. मुंबई आणि पुण्यामध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतीच आहे.