पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चांद्रयान-२ मुळे संपूर्ण देशाचा गौरव - पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी

चांद्रयान-२ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) कामाचे कौतुक केले. चांद्रयान-२ मुळे संपूर्ण देशाचा गौरव झाला असल्याचे नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

सोमवारी दुपारी दोन वाजून ४३ मिनिटांनी आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन उड्डाणतळावरून जीएसएलव्ही मार्क ३ प्रक्षेपकाच्या साह्याने चांद्रयान-२ अवकाशात झेपावले. गेल्या सोमवारी तांत्रिक दोषामुळे चांद्रयान-२ चे प्रक्षेपण स्थगित करण्यात आले होते. दोष दूर करण्यात आल्यानंतर गेल्या आठवड्यातच आज (सोमवारी) चांद्रयान-२ चे प्रक्षेपण होईल, असे इस्रोकडून जाहीर करण्यात आले होते.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काही वेळापूर्वीच या मोहिमेत सहभागी शास्त्रज्ञांशी मी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यांना संपूर्ण देशवासियांकडून शुभेच्छा दिल्या. चांद्रयान-२ मोहिमेमुळे देशातील तरुण पिढीचा विज्ञानाकडील कल वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर या क्षेत्रात संशोधन आणि नाविन्यपूर्ण कल्पना आणल्या जातील. चांद्रयान-२ मोहिमेमुळे चंद्राची नवी माहिती आपल्याला मिळणार आहे. आतापर्यंत चंद्राच्या ज्या बाजूचा कोणीच अभ्यास केलेला नाही, तो या मोहिमेच्या माध्यमातून केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.