पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पश्चिम बंगालः भाजपच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रूधुराचाही वापर

पश्चिम बंगालः भाजपच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रूधुराचाही वापर

पश्चिम बंगालमध्ये बुधवारी आणखी एका भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह मिळाल्यानंतर राज्यातील तणावात पुन्हा वाढ झाली आहे. सातत्याने होत असलेल्या हिंसाचाराविरोधात भाजप कार्यकर्ते बुधवारी ममता बॅनर्जी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले. पोलिस मुख्यालयाकडे जात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. त्याचबरोबर पाण्याचाही वापर करत भाजप कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आली आहेत. राज्यातील हिंसाचाराचे लोण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. 

दरम्यान, बुधवारी माल्दा येथे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर तणावात वाढ झाली. मागील काही दिवसांपासून सातत्याने भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येमुळे नाराज भाजप कार्यकर्ते प्रचंड चिडले आहेत. 

कोलकाता येथे चिडलेले भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन ममता सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. आपला राग व्यक्त करण्यासाठी, पोलिस मुख्यालयाला घेराव घालण्यासाठी मार्गक्रमण केलेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या संतप्त भाजप कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना पाण्याचा तसेच अश्रूधुराचा वापर करावा लागला.